मुंबई : महिला सुरक्षेबाबत रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलातर्फे करण्यात आलेले दावे पुन्हा एकदा फोल ठरले आहेत. चालत्या लोकलवर दगड मारल्यामुळे महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. अश्विनी शेरे असे या महिलेचे नाव असून, त्या ६१ वर्षांच्या आहेत. त्यांच्या डोक्यावर तीन टाके घालण्यात आले आहेत.घाटकोपर येथे राहणा-या अश्विनी शुक्रवारी सीवूड येथे निघाल्या होत्या. कुर्लामार्गे हार्बर रेल्वेतून प्रवास करत असताना चेंबूर स्थानकाजवळ अनोळखी इसमाने लोकलच्या दिशेने दगड भिरकावला. तो दगड अश्विनी यांच्या डोक्याला लागला. गर्दीची वेळ असल्यामुळे अश्विनी डब्याच्या दरवाजाजवळ उभ्या होत्या. त्यामुळे तो दगड त्यांच्या डोक्याला लागला.अश्विनी यांना उपचारासाठी वाशी स्थानकातील वन रुपी क्लिनिक येथे दाखल करण्यात आले. उपचाराअंती त्यांच्या डोक्यावर तीन टाके घालण्यात आले. या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, यामुळे पुन्हा एकदा लोकलमधील महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
चालत्या लोकलवरील दगडफेकीत घाटकोपर येथे राहणारी महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 2:10 AM