सेनेतील अल्पसंख्याकांवर अन्याय

By admin | Published: July 12, 2015 01:08 AM2015-07-12T01:08:18+5:302015-07-12T01:08:18+5:30

राष्ट्रवादी काँगे्रस शहरातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करत असताना दुसरीकडे शिवसेनेत मात्र अल्पसंख्याक व इतर प्रांतांमधील कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे.

Injustice to the minority in the army | सेनेतील अल्पसंख्याकांवर अन्याय

सेनेतील अल्पसंख्याकांवर अन्याय

Next

- नामदेव मोरे, नवी मुंबई
राष्ट्रवादी काँगे्रस शहरातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काम करत असताना दुसरीकडे शिवसेनेत मात्र अल्पसंख्याक व इतर प्रांतांमधील कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. पालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकाही पदाधिकाऱ्यास स्वीकृत सदस्य, परिवहन, शिक्षण मंडळ व इतर समित्यांवर नियुक्ती केलेली नसून यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईच्या राजकारणामधील गणेश नाईक यांचे वर्चस्व संपविण्यासाठी शिवसेना दोन दशकांपासून धडपडत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेमुळे सेनेला यश मिळाले. परंतु महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वातावरण अनुकूल असतानाही अंतर्गत भांडणामुळे सत्ता गमवावी लागली. निवडणुकीनंतरही पक्षातील गटबाजी सुरूच आहे. परिवहन समितीवरील निवडीमध्ये सीवूडमधील शाखाप्रमुख समीर बागवान यांचा पत्ता आयत्या वेळी कट करण्यात आला. यानंतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील अल्पसंख्याक व इतर प्रांतांमधील पदाधिकाऱ्यांच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. शिवसेनेमध्ये समीर बागवान, सय्यद अबरार, चांद पटेल, तय्यब पटेल, राजू शेख हे मुस्लीम पदाधिकारी विविध पदांवर काम करत आहेत. गुजराती व केरळ समाजप्रमुख म्हणूनही काही पदाधिकारी काम करत आहेत. परंतु महापालिकेची स्थापना झाल्यापासून शिवसेनेने कधीच या पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केलेले नाही. स्वीकृत सदस्य, परिवहन, शिक्षण मंडळ या समित्यांवरही कोणाचीच नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही.
शिवसेनेत अल्पसंख्याक व इतर राज्यातील पदाधिकारी फक्त दिखाव्यासाठीच असल्याची टीका होऊ लागली आहे. नवी मुंबईमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक राहण्यासाठी आले आहेत. संबंधित समाज जोडण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी अद्याप कधीच प्रयत्न केलेले नाहीत. निवडणुकीत फक्त तीन मतांनी पराभव झालेले बागवान यांना आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे २०१० च्या निवडणुकीत तिकीट नाकारले. २०१५ च्या निवडणुकीमध्येही सेनेच्या यादीमध्ये त्यांचे नावच नव्हते. प्रभाग १०९ भाजपाला सोडण्याचे जवळपास निश्चित झाले होते. परंतु प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु त्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे मध्यरात्री भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितल्यानंतर हा प्रभाग त्यांना सोडण्यात आला होता.
उमेदवारीच्या घोळामुळे प्रचारास कमी वेळ मिळून फक्त तीन मतांनी पराभव झाला. स्वीकृत नगरसेवक व परिवहनसाठीही त्यांचा विचार झालेला नाही. शिवसेनेत न्याय मिळत नसल्यामुळेच इतर समाज पक्षाच्या सोबत येत नसल्याचेही काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी मात्र पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी दिली जात असून बागवान यांनाही लवकरच चांगली संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रवादीने दिले सर्व समाजांना प्रतिनिधित्व
महापालिकेच्या स्थापनेपासून एकहाती वर्चस्व ठेवणाऱ्या गणेश नाईक यांनी सर्व समाजांना सोबत घेण्यात यश मिळविले आहे. नवी मुंबईमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध जाती-धर्माचे नागरिक वास्तव्यासाठी आले आहेत. शहराचा विकास करण्यासाठी सर्व समाज सोबत घेतला पाहिजे. प्रत्येकाला प्रतिनिधित्व दिले पाहिजे, अशी भूमिका नाईक यांनी पहिल्यापासून घेतली आहे.
यामुळेच आतापर्यंत दक्षिणेकडील राज्यातील रवी अय्यर यांना शिक्षण मंडळ सभापती, सशी दामोदरन यांना एनएमएमटी सभापती पद दिले आहे. साबू डॅनियल यांना दोन वेळा स्वीकृत नगरसेवक व आता परिवहन सदस्य बनविले आहे. जब्बार खान व सिराज बशीर यांना स्वीकृत नगरसेवक बनविले. अर्जुनलाल सिंघवी यांनाही शिक्षण मंडळ सभापती केले आहे.
या व्यतिरिक्त रामआशीष यादव दोन वेळा नगरसेवक झाले आहेत. या व्यतिरिक्त वीरेश सिंग, संजीवकुमार लडोईया, माधवसिंग राजपूत, हमीद खानजादा, जसपाल अरवाल, धरमसी पटेल, पीयूष पटेल, दलपतभाई पटेल, मुनावर पटेल, प्रेमकुमार काराईल, कृष्णकुमार अमृत, अन्वर शेख अशा अनेकांना प्रभाग समिती, शिक्षण मंडळ, परिवहन व इतर पदांवर नियुक्त केले आहे.
सर्व समाजाला एकत्र घेतल्यामुळेच नाईकांचे शहरात एकहाती वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. परंतु शिवसेना नेत्यांनी याचा कधीच विचार केलेला नसल्यामुळे वातावरण चांगले असूनही पक्षाला महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता मिळविता आलेली नाही.

Web Title: Injustice to the minority in the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.