पोलीस भरतीत ओबीसींवर अन्याय; PSI च्या ६५० जागांची जाहिरात रद्द करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 10:04 AM2020-03-02T10:04:09+5:302020-03-02T10:08:54+5:30
राज्यात ६५० पीएसआय जागांसाठी एमपीएससी अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे.
मुंबई - राज्यात एमपीएससी अंतर्गत निघालेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या ६५० जागांच्या जाहिरातीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या जाहिरातीत राखीव प्रवर्गाच्या जागांमध्ये आरक्षणानुसार जागा देण्यात आल्या नसून यावरुन भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि माजी आमदार रामराव वडकुते यांनी राज्य सरकारकडे ही जाहिरात रद्द करण्याची मागणी केली.
याबाबत पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, राज्यात ६५० पीएसआय जागांसाठी एमपीएससी अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. यात शासनाच्या नियमानुसार भटक्या जमाती ड प्रवर्गासाठी २ टक्के आरक्षण असताना त्यांना एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे याबाबत एमपीएससी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या संतापजनक प्रतिक्रिया आहेत. यात तातडीने सरकारने लक्ष घालावे आणि उमेदवारांवर झालेला अन्याय दूर करुन सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तर माजी आमदार रामराव वडकुते यांनीही राज्य सरकारचं लक्ष वेधलं आहे. पीएसआयच्या ६५० जागांपैकी केवळ १ जागा धनगर समाजाला देण्यात आली आहे. धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण देण्यात येतं, मग एमपीएससीतील कोणता अधिकारी असा आहे की त्याचं गणित ६५० पैकी १ जागा धनगर समाजाला देण्यात आली. किमान २३ ते २४ जागा धनगर समाजातील युवकांसाठी देण्यात यावी असं त्यांनी सांगितले.
तसेच पंकजा मुंडेंनी हा प्रश्न लावून धरताना त्या केवळ वंजारी समाजाच्या नेत्या नाही तर ओबीसीचं नेतृत्व करत आहात. त्यामुळे भटक्या समाजावरील या अन्यायाची दखल त्यांनी राज्य शासनापर्यंत पोहचवावी असं वडकुतेंनी सांगितले, दरम्यान धनगर समाज एखाद्याला सत्तेत बसवू शकतो तसं सत्तेतून पायउतारही करायला लावू शकतो. धनगर समाजातील तरुणांवर अशाप्रकारे अन्याय होत असेल तर ते योग्य नाही. त्यामुळे ही जाहिरात त्वरीत बदलून धनगर समाजाला आरक्षणानुसार २३ ते २४ जागा देण्यात याव्यात, संबंधित एमपीएससीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी रामराव वडकुते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. राज्यात पीएसआयच्या ६५० जागेसाठी जाहिरात देण्यात आली आहे. यामध्ये महिलांसाठी १९५, खेळाडूंसाठी ३२ तर अनाथांसाठी ६ पदे आरक्षित आहेत.