लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. येत्या ५ एप्रिलपासून हे आमरण उपोषण सुरू होणार असल्याचे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचे केंद्रीय सदस्य गणेश वायफळकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई विभागातून सेवानिवृत्त झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्त होऊन ३ ते ४ वर्षे उलटूनही पेन्शन सुरू झालेली नाही.
सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची देणी उदाहरणार्थ कामगार करारातील वेतनवाढीचा फरक, शिल्लक रजेचे रजा रोखीकरण, अदेय रकमा इत्यादी ३ ते ४ वर्षांचा कालावधी उलटूनही अद्यापपर्यंत संपूर्ण दिलेली नाहीत. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रोजंदारीचे उपदान देण्यास टाळाटाळ करीत आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी सेवेत असताना, त्यांच्याकडून हंगामी बढतीचे काम करून घेऊनही त्याचा मोबदला दिला नाही. असे अनेक प्रलंबित प्रश्न सुटण्यासाठी वारंवार प्रत्यक्ष भेटून, धरणे आंदोलन नोटीस देऊन, उपोषण नोटीस देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नाइलाजास्तव आर.एन. म्हसकर, विभागीय सचीव, राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना, मुंबई विभाग ५ एप्रिल, २०२१ पासून राज्य परिवहन मुंबई विभागीय कार्यालय, विद्याविहार, मुंबई ४०० ०८६ येथे आमरण उपोषणाकरिता बसणार आहेत, अशी माहिती गणेश वायफळकर यांनी दिली.