लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेत सायन्समध्ये बायफोकल विषय घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना प्लेन सायन्समध्ये त्यांच्या गुणवत्तेनुसार कॉलेजमध्ये प्रवेश दिला जात असून, नंतर तिसऱ्या फेरीअंती प्रत्येक कॉलेज त्यांच्या कॉलेजची बायफोकल विषयासाठी स्वतंत्र मेरिट लिस्ट लावणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शासनाच्या प्रवेश प्रक्रियेनुसार चांगले कॉलेज मिळाले, परंतु तिसऱ्या फेरीनंतर त्या कॉलेजच्या मेरीट लिस्टनुसार बायफोकल विषय मिळाला नाही तर त्या विद्यार्थ्याला त्यावेळी कॉलेजही बदलता येणे शक्य होणार नाही.
शासनाच्या प्रवेश प्रक्रियेनुसार ९५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना जर अ कॉलेज मिळाले आणि ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना जर ब कॉलेज मिळाले व त्यानंतर प्रत्येक कॉलेजने बायफोकल विषयासाठी लावलेल्या मेरिट लिस्टनुसार अ कॉलेजमध्ये फक्त ९८ पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बायफोकल विषय मिळाले व ब कॉलेजमध्ये ९५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बायफोकल विषय मिळाले, तर ९६ टक्के व ९७ टक्के गुण असलेल्या अ कॉलेजमधील विद्यार्थ्यांवर बायफोकल विषय न मिळाल्याने अन्याय होणार आहे. त्यांना ९६ टक्के अथवा ९७ टक्के गुण असल्याने ब कॉलेजमध्ये बायफोकल विषय मिळू शकला असता. परंतु, शासनाच्या प्रवेश प्रक्रियेनुसार त्यांना अ कॉलेज मिळाल्याने ते आता ब कॉलेज निवडू शकणार नाहीत, अशी माहिती पालक प्रकाश सोनमळे यांनी दिली.
असाच अन्याय टेक्निकल विषय घेऊन दहावी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांवरही या प्रवेश प्रक्रियेमुळे होणार आहे. कारण बायफोकल विषयासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये २५ टक्के जागा टेक्निकल विषय घेऊन दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. उदाहरणार्थ सध्याच्या प्रवेश प्रक्रियेनुसार जर दहावी टेक्निकल विषय घेऊन पास झालेल्या एकूण २०० विद्यार्थ्यांना अ कॉलेज मिळाले व २५ विद्यार्थ्यांना ब कॉलेज मिळाले आणि बायफोकल विषयासाठी अ व ब कॉलेजमध्ये एकूण २०० जागांपैकी २५ टक्के म्हणजे ५० जागा १०वी टेक्निकल विषय घेऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील, असे समजूया. कॉलेजने बायफोकल विषयासाठी मेरिट लिस्ट लावल्यानंतर अ कॉलेजमधील २०० टेक्निकल विषय घेऊन दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ५० राखीव जागांवर बायफोकल विषय मिळाला, परंतु ब कॉलेजमध्ये शासनाच्या प्रवेश प्रक्रियेनुसार दहावी टेक्निकल विषय घेऊन २५ विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिल्यामुळे दहावी टेक्निकल विषयाच्या विद्यार्थ्यांच्या त्या कॉलेजमधील ५० पैकी २५ जागांवरच बायफोकल विषयासाठी प्रवेश देण्यात येईल व २५ जागा रिकाम्या ठेवण्यात येतील.
अ कॉलेजमधील दहावी टेक्निकल विषयानुसार प्रवेश मिळालेल्या २०० पैकी फक्त ५० विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी राखीव असलेल्या जागांवर बायफोकल विषय मिळणार. परंतु, १५० विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. कारण ब कॉलेजमधील विद्यार्थ्यांपेक्षा चांगले गुण मिळवले असतानादेखील अ कॉलेजमधील दहावी टेक्निकल विद्यार्थ्यांना बायफोकल विषय मिळणार नाही. परंतु, ब कॉलेजमध्ये दहावी टेक्निकलच्या २५ जागा रिकाम्या राहणार आहेत व त्या क्षणाला अ कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेले दहावी टेक्निकल विषयाचे विद्यार्थी बी कॉलेज निवडू शकणार नाहीत. तरी या शासनाच्या प्रवेश प्रक्रियेत अकरावी सायन्सप्रमाणेच अकरावी सायन्स बायफोकल असाही वेगळा पर्याय ठेवून दोन्ही पर्यायांसाठी वेगवेगळी मेरिट लिस्ट लावावी व दोन्ही पर्यायांसाठी वेगवेगळी प्रवेश प्रक्रिया सुरुवातीपासूनच राबविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.