Join us

तलाठी भरतीत दिव्यांगांवर अन्याय, आयुक्तांची नोटीस, जाहिरात गोंधळामुळे भरती लांबणार?

By दीपक भातुसे | Published: June 30, 2023 10:38 AM

Recruitment: रखडलेल्या तलाठी भरतीची जाहिरात मागील आठवड्यात प्रकाशित झाली असली तरी या जाहिरातीतील गोंधळामुळे तलाठी भरती लांबण्याची चिन्हे आहेत.

- दीपक भातुसे मुंबई : रखडलेल्या तलाठी भरतीची जाहिरात मागील आठवड्यात प्रकाशित झाली असली तरी या जाहिरातीतील गोंधळामुळे तलाठी भरती लांबण्याची चिन्हे आहेत.

महसूल विभागाने २३ जून रोजी ४,६४४ तलाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली. यानुसार २६ जून ते १७ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, या जाहिरातीत आरक्षित जागांमध्ये गोंधळ असल्याचे समोर आले असून, दिव्यांगांना असलेल्या आरक्षणानुसार जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या नाहीत.

या प्रकरणाची दिव्यांग कल्याण आयुक्तांनी स्वधिकारात (सु मोटो) दखल घेऊन राज्य परीक्षा समन्वयकांना नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार पुढील सात दिवसात याप्रकरणी खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

दिव्यांगांच्या विविध संवर्गासाठी १७२ जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. दिव्यांगांना ४ टक्के आरक्षण आहे. ४,६४४ जागांवर त्यांच्यासाठी आरक्षित जागांची संख्या १८५.७५ म्हणजेच १८६ असायला हवी होती. परभणी, नांदेड, उस्मानाबाद, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, नाशिक, मुंबई उपनगर या जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींकरता राखीव पदांची परिगणना चुकीची आढळून आली आहे.  

अस्थिव्यंग संवर्गासाठी २९ जागा आरक्षित हव्यात. जाहिरातीत मात्र चारच जागा आरक्षित आहेत. जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी आरक्षित जागांचा जो मसुदा तयार करण्यात आला होता त्यात अस्थिव्यंग संवर्गासाठी २९ जागा आरक्षित होत्या, जो आकडा बरोबर आहे.- दिनेश देवरकर, उमेदवार, बुलढाणा

टॅग्स :सरकारनोकरी