मुंबई-
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी अखेर आज पार पडला आणि राज्याला १८ मंत्री मिळाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत आज भाजपाच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. समोर आलेल्या माहितीनुसार या सर्व मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ शपथविधीमध्ये एकाही महिला आमदाराला स्थान मिळालेलं नाही. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
उत्तर महाराष्ट्राचा 'पंच', मराठवाड्याचा 'चौकार'; जाणून घ्या, शिंदे-फडणवीस सरकारचा विभागनिहाय विस्तार
सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा दाखला दिला आणि भाजपावर निशाणा साधला आहे. "स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचं सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्व देण्यात आलेलं नाही", असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
"मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री शक्तीवर हा अन्याय आहे", असं ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री१. राधाकृष्ण विखे पाटील - शिर्डी
२. गिरीश महाजन - जामनेर, जळगाव
३. गुलाबराव पाटील - जळगाव ग्रामीण
४. दादा भुसे - मालेगाव बाह्य
५. विजयकुमार गावित - नंदुरबार
६. संदीपान भुमरे - पैठण
७. तानाजी सावंत - परांडा, उस्मानाबाद
८. अब्दुल सत्तार - सिल्लोड, औरंगाबाद
९. अतुल सावे - औरंगाबाद पूर्व
१०. चंद्रकांत पाटील - कोथरुड, पुणे
११. सुरेश खाडे - मिरज
१२. शंभुराज देसाई - पाटण, सातारा
१३. सुधीर मुनगंटीवार - बल्लारपूर
१४. संजय राठोड - दिग्रस, यवतमाळ
१५. उदय सामंत - रत्नागिरी
१६. दीपक केसरकर - सावंतवाडी
१७. रवींद्र चव्हाण - डोंबिवली
१८. मंगलप्रभात लोढा - मलबार हिल, मुंबई