मुंबई :
काही बाळांना जन्मजात व्यंग असते याची फारशी पालकांना माहिती नसते. त्याचबरोबर अनेक डॉक्टरांना त्यावर उपचार नेमक्या कशा पद्धतीने करायचे हे माहितीही नसते. त्यापैकीच एक आजार म्हणजे स्पाइना बिफिडा. अनेक वेळा या बालकांना योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे काही बालके दगावतात, तर काही बालकांच्या मेंदूचा विकास न झाल्याने खितपत आयुष्य काढावे लागते. या आजाराचे बहुतांश रुग्ण हे ग्रामीण भागात असतात, कारण त्यांना वेळेत योग्य उपचार मिळत नाहीत. कारण अशा बाळांना योग्य उपचार मिळण्यासाठी अनेक शस्त्रक्रियांची गरज भासते. त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करण्यासोबत ज्या रुग्णांना ही शस्त्रकिया करणे परवडत नाही अशा रुग्णांवर लीलावती रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. सध्याच्या घडीला दरवर्षी सरासरी देशात ५० हजार बालकांना हा आजार होतो. विशेष म्हणजे या आजाराला सहजरीत्या प्रतिबंध करणे शक्य आहे. लग्नानंतर ज्यावेळी मूल हवे आहे अशा मातांनी त्याअगोदर फोलिक ॲसिडच्या गोळ्या घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ८० टक्के प्रमाणात हा आजार बाळांना होत नाही. २० टक्के आनुवंशिक हा आजार बाळांना होतो.
स्पाइना बिफिडा हा जन्मजात आजार असून यात पाठीचा कणा पूर्णपणे विकसित झालेला नसतो. त्यामुळे या बाळाच्या पायाची वाढ व्यवस्थित होत नसून पोलिओपेक्षा भयंकर अवस्था पायाची असते. तसेच या आजारात बाळाच्या डोक्यात पाणी साठलेले असते. त्यामुळे मेंदूची वाढ होत नाही. लघवीवर नियंत्रण राहत नाही. बाळाच्या जन्मानंतर तत्काळ या आजाराचे निदान करून त्यावर योग्य उपचार करणे गरजेचे असते. गरिबांना यावर उपचार घेता येत नाही. या अशा रुग्णांना उपचाराविषयी माहिती मिळावी यासाठी १२, १३ फेब्रुवारीला लीलावतीत मोफत शिबिर होणार आहे.
माझ्या प्रॅक्टिसमध्ये ४०० - ५०० स्पाइना बिफिडाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. माझे काही रुग्ण सध्या नीट परीक्षेची तयारी करीत आहेत. या रुग्णावर उपचारासाठी बालरोग तज्ज्ञ, शल्यचिकित्सक, न्यूरो सर्जन, न्यूरो फिजिशियन, फिजिओथेरपिस्ट यांची गरज भासते. लीलावती रुग्णालयात सगळे तज्ज्ञ आणि त्या उपचारासाठी लागणाऱ्या चाचण्या उपलब्ध आहेत. गरीब पालकांच्या मुलांना या शिबिराचा नक्कीच फायदा होईल. देशातील डॉक्टरांना या शिबिराविषयी सांगितले आहे. - डॉ. संतोष करमरकर, शल्यचिकित्सक, लीलावती रुग्णालय उपचारांबाबत जनजागृती याबाबत माहिती देताना लीलावती रुग्णालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. रविशंकर यांनी सांगितले, या आजाराच्या उपचारांबाबत आणि त्या आजाराला कसा प्रतिबंध करता येईल यावर जनजागृती करणे गरजेचे आहे. त्याकरिता मोफत शिबिर आमच्या रुग्णालयात होणार आहे. कारण ज्या विविध विषयांच्या या बाळाच्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. त्या सर्व आमच्या रुग्णालयात होतात. या शिबिरात ज्या पालकांना खर्च परवडणार नाही त्या रुग्णांच्या मोफत शस्त्रकिया करण्यात येतील. याकरिता स्पाइना बिफिडा फाउंडेशनचे सहकार्य मिळाले आहे. सीएसआर फंडातून हे काम आम्ही करणार आहोत.