'देशात दररोज निष्पाप मुस्लिमांना मारलं जातंय, आता बोलते व्हा'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 08:21 PM2019-01-29T20:21:55+5:302019-01-29T20:24:42+5:30
ज्यावेळी, मी नसरुद्दीन शहांचं भाषण ऐकलं, त्यावेळी मला अनेक प्रश्न पडले. आज बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री एकदम सायलंट झाल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबई - ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या सत्कार कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, बोलताना सहगल यांनी देशातील परिस्थितीवर भाष्य केलं. सध्या रस्त्यावर निष्पाप लोकांना ठार केलं जातयं. मुस्लिमांना दररोज मारलं जातंय, तर निष्पाप लोकांना विनाकारण तुरुंगात टाकलं जातयं. आता, आपण पुढे येऊन याबाबत बोललं पाहिजे, असे सहगल यांनी म्हटलं.
ज्यावेळी, मी नसरुद्दीन शहांचं भाषण ऐकलं, त्यावेळी मला अनेक प्रश्न पडले. आज बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री एकदम सायलंट झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच देशातील वातावरण इतकं चांगल नसल्याचंही त्या म्हणाल्या. मात्र, शेवटी 'हम हिंदूस्थानियत को नही छोडेंगे', असे म्हणून त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला. नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेलं मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी अचानक रद्द केलं होतं. सुरक्षेच्या कारणावरून निमंत्रण रद्द करण्यात आल्याचा ईमेल सहगल यांना आयोजकांकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर सहगल आणि मराठी साहित्य संमेलनाचा वाद राज्यभर चांगलाच चर्चेचा विषय बनला होता.
'माझ्या भाषणातून मी देशातील सद्यस्थितीवर बोलणार होते. माझं भाषण मी आयोजकांना पाठवलं होतं. त्यांनी त्याचा अनुवाद केला होता. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार आहेत, याची मला कल्पना नव्हती. भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना कदाचित माझं भाषण आवडलं नसेल,' असं म्हणत सहगल यांनी भाजपावर एकप्रकारे टीकाच केली होती. आज मुंबईत एका कार्यक्रमात सहगल यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना पुन्हा एकदा सहगल यांनी देशातील परिस्थितीवर आपलं मत मांडल.