लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अँँटालिया येथे स्कॉर्पियो पार्क केल्यानंतर आरोपी इनोव्हात बसून निघून गेला. अशात हेडलाइटच्या फ्लॅशमुळे वाहनाचा क्रमांक सापडला नाही.
गुन्हे शाखेला सीसीटीव्हीतून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री १ वाजून २० मिनिटांनी स्कॉर्पियो आणि इनोव्हा ठाण्यातून मुंबईत आली. पुढे, २ वाजून १८ मिनिटांनी ती कारमायकेल रोडवर पार्क केली. त्यानंतर स्कॉर्पियो पार्क करून आरोपी इनोव्हामध्ये बसून पुढे, पहाटे तीन वाजून ५ मिनिटांनी पुन्हा ठाण्याच्या दिशेने जाताना दिसले. मुंबई भागातील सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र ठाणे परिसरातील सीसीटीव्ही मिळत नसल्यामुळे इनोव्हा नेमकी कुठे गेली, याबाबत माहिती मिळण्यास अडचणी येत आहेत. तसेच इनोव्हा कारवरील वाहन क्रमांकही बनावट असल्याची माहिती समोर येत आहे.
* वाहनांची झाडाझडती सुरू
पोलिसांकडून मुंबईतील बेवारस वाहनांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. शिवाय चोरीच्या वाहनांचीही माहिती घेण्यात येत आहे.
* राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून समांतर तपास, हेतू घाबरवण्याचा
राष्ट्रीय तपास यंत्रणाही याचा समांतर तपास करत आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला आहे. प्राथमिक तपासात घाबरवण्याच्या हेतूने हा प्रताप केल्याची शक्यता गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली. यामागचे गूढ उकलण्यासाठी इनोव्हा चालकाचा शाेध लागणे गरजेचे असून त्या दिशेने पोलीस अधिक तपास करत आहेत.
..................