राज्यात उभी राहताहेत बालशास्त्रज्ञ घडवणारी ‘इनोव्हेशन हब’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 05:34 AM2020-02-28T05:34:00+5:302020-02-28T05:35:03+5:30
नेहरू विज्ञान केंद्राचा उपक्रम; अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, अमरावती, पुण्यानंतर आता सोलापुरातही सुरू होणार हब
- सचिन लुंगसे
मुंबई : खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, संशोधन करता यावे, एखादी वस्तू तोडून, मोडून पुन्हा जोडता यावी, यासारख्या छोट्या संशोधनापासून वापरातील प्रत्येक गोष्टीत त्यांना संशोधन करता यावे; म्हणून मुंबईतील वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्र सरसावले आहे. केंद्राने अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, अमरावती, पुणे येथे इनोव्हेशन हब सुरू केले आहे.
केंद्राचे अधिकारी उमेश कुमार रुस्तगी आणि शिक्षणाधिकारी मंजुळा यादव यांनी सांगितले की, मुंबई येथे २०१४ साली इनोव्हेशन हब सुरू झाले. अहमदनगरमधील प्रवरानगर, कोल्हापूरमधील वारणा, सातारा, अमरावती, पुणे आणि नागपूर अशी मिळून राज्यात सात ठिकाणी इनोव्हेशन हब सुरू असून, सोलापूर येथे तो मार्चमध्ये कार्यान्वित होईल.
इनोव्हेशनचे काम तीन स्तरांवर सुरू आहे. विद्यार्थ्यांना हबचे सदस्य होता येते. त्यांच्यासाठी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली जाते. हबचे सदस्य झाल्यास चार बॅचमध्ये संशोधन करता येते. चार बॅचचे एकूण ३०० विद्यार्थी होतात. एक दिवसीय कार्यशाळेत कोणीही सहभागी होऊ शकते. या अंतर्गत आयोजित एक्सपोजर व्हिजिटमध्ये वर्षाला १० हजार लोक भेट देतात. सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हबच्या संशोधनात सहभागी होता येते. जी मुले शाळेत न जाता घरीच अभ्यास करतात त्यांनाही येथे संशोधन करता येते. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ५, ६ आणि ७ मार्च रोजी नवप्रवर्तन उत्सव (इनोव्हेशन फेस्टिव्हल) आयोजित केला असून, या उत्सवाअंतर्गत विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासह संशोधकांंना भेटता येईल.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोग सुरू
सायन्स इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरद्वारे शैक्षणिक संस्थांना जोडण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रयोग होत आहे. एका सेंटरला २.६ कोटी रुपये एवढा खर्च येतो आहे. खेड्यातल्या विद्यार्थ्यांना विज्ञान साध्या, सोप्या भाषेत समजावून सांगितले जाईल.
- शिवप्रसाद खेनेद,
संचालक, नेहरू विज्ञान केंद्र