खराब झालेल्या बॅटरीच्या पुनर्वापरातून नवनिर्मिती; संशोधन स्पर्धेत सुवर्णपदक
By स्नेहा मोरे | Published: August 25, 2023 09:12 PM2023-08-25T21:12:54+5:302023-08-25T21:13:04+5:30
मुंबई विद्यापीठात लि-आयन बॅटरी पुनर्वापराच्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध
मुंबई - खराब झालेल्या लिथियम आयन बॅटरी सर्रास फेकून देण्यात येतात. या बॅटरीमधील रसायने ही पर्यावरणासाठी हानीकारक असतात, यामुळे पर्यावरणाची हानी होते. यावर तोडगा काढत मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात लिथियम-आयन बॅटरी पुनर्वापराच्या नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावण्यात आला आहे. मोबाईल लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट वॉच, इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह इलेक्टिक वाहनांमध्ये वापरून खराब झालेल्या लिथियम आयन बॅटरी मधील महत्वाच्या घटकांचा पुनर्वापर करून पुन्हा नवीन उच्च क्षमतेची ली-आयन बॅटरी बनविण्याचे यशस्वी संशोधन रसायनशास्त्र विभागातील संशोधक प्राध्यापक डॉ. विश्वनाथ आर. पाटील यांच्या चमूने केले आहे. या संशोधनाचे पेटंटही शासनाकडे नोंदविण्यात आले आहे.
सध्याचे अनेक उपकरणांमध्ये ली- आयन बॅटरीचा वापर होतो. देशात ली-आयन बॅटरी बनविण्यासाठी लागणारे मटेरियल परदेशातून आयात करावे लागते. देशात मोठ्या प्रमाणात आयन बॅटरी ई-वेस्ट तयार होतो, ज्यामधून महत्वाचे घटकांचा पुनर्वापर करून नवीन उच्च क्षमतेची ली-आयन बॅटरी बनविण्यासाठी केला जाऊ शकतो. जगात सर्वाधिक ली-आयन ई-वेस्ट भारतात आहे.
तज्ज्ञांच्या मते पारंपरिक लेड ॲसिड बॅटरीज रिसायकल करण्यात येत होत्या. मात्र, आतापर्यंत लिथियम-आयन बॅटरी पुनर्वापर करण्यासाठी पुरेसा योग्य मार्ग मिळालेला नव्हता. इलेक्ट्रीक वाहनांमधील बॅटरी शेकडो लिथियम आयन सेल्सनी बनलेल्या असून त्यात अनेक घातक पदार्थ असतात. जर त्यांना काळजीपूर्वक तोडल्या नाही तर स्फोट होऊ शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इलेक्ट्रीक वाहनांची बहुतेक उपकरणे पुन्हा वापरली जातात. मात्र, अद्याप बॅटरीचा पुनर्वापर करण्याचा कोणताही आर्थिक दृष्ट्या फायदेशीर मार्ग उपलब्ध नव्हता.
संशोधन स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक
संशोधन करीत असताना खराब झालेल्या ली-आयन बॅटरीजचा पुनर्वापर करून या तिघांनी नवीन उच्च क्षमतेची बॅटरी बनविण्याचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय नामांकित जर्नल सस्टेनेबल मटेरिअल्स अँड टेक्नोलाॅजी ( इम्पॅक्ट फॅक्टर - १०.६८ )मध्ये प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनासाठी राष्ट्रीय पातळीवर त्यांना अन्वेषण व अविष्कार या संशोधन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे. रसायनशास्त्र विभागातील डॉ. विश्वनाथ आर. पाटील आणि स्वच्छ ऊर्जा एलाईन्स चे डॉ. सुनील पेशने यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करीत असलेला रोशन राणे विद्यार्थ्याचा लिथियम आयन बॅटरी हा संशोधनाचा विषय आहे.
ली- आयन बॅटरीचा पुनर्वापर प्रकल्प फायदेशीर
नवीन संशोधनामुळे लिथियम रिकव्हरी सोबत बॅटरीतील सगळ्यात मोठ्या घटकाचे, कार्बनचे ग्राफिन ऑक्साईड या बहुगुणी आणि मौल्यवान रेणूमध्ये रुपांतर होणार आहे. त्यामुळे हा उद्योग चांगलाच फायदेशीर ठरेल आणि त्याला अधिक मागणी देखील येणार आहे. बॅटरीमध्ये असलेले हानिकारक रसायन पर्यावरणासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने ली- आयन बॅटरीचा पुनर्वापर प्रकल्प नक्कीच फायदेशीर ठरू शकणार आहे. - डॉ. विश्वनाथ आर. पाटील , संशोधन रसायनशास्त्र विभागातील संशोधक प्राध्यापक