Join us

नाविन्यपूर्ण संकल्पना : मोबाइल विसर्जन वाहनांची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 6:23 PM

विषाणूचा प्रसार रोखणे शक्य

मुंबई : कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्या समाज जीवनाला योग्य ती खबरदारी घेऊन उत्सव साजरा करण्याकरीता प्रोत्साहन देण्यात मुंबई महापालिका यशस्वी होते आहे, असे चित्र मुंबईत दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गोरेगाव (पी दक्षिण) विभागाने जय्यत तयारी करून गोरेगावकरांना ४ पारंपारीक विसर्जन स्थळांसोबतच ६ कृत्रिम तलाव आणि नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत २ सजवलेल्या ट्रकवर ठेवलेल्या मोबाइल विसर्जन वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या विकेंद्रीकरणाच्या नियोजनामुळे पारंपारीक विसर्जन स्थळांवर होणारी गर्दी टाळणे व परीणामी कोव्हीड १९ विषाणूचा प्रसार रोखणे शक्य होते आहे.

कोरोना रोखण्यासाठी आणि आता गणेशोत्सव सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी घेतलेल्या परीश्रमांना गोरेगावकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन सोसायट्यांच्या आवारातच केल्यामुळे गर्दीवर नियंत्रण राखणे शक्य झाले. विसर्जन स्थळांवरील गर्दी बरीच कमी जाणवत आहे. सेवाभावी संस्थांनीही मनपाच्या मूर्ती संकलन वाहन सुविधेचा वापर करून प्रशासनाला सहकार्य केले आहे. ” अशी माहिती पी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त  संतोषकुमार धोंडे यांनी दिली.

गोरेगाव पी दक्षिण विभागात गतवर्षी 8570 घरगुती व 475 सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन झाले होते. या वर्षी लोकसंख्येच्या घनतेचा सखोल अभ्यास करून ८ विविध ठिकाणी अतिरीक्त विसर्जन स्थळे उपलब्ध करून देण्यात आली. या विसर्जन स्थळांची व गणेशोत्सव साजरा करताना कोणती खबरदारी घ्यायची याची माहिती विविध प्रसारमाध्यमे, सोशल मिडीया, स्थानिक संस्था, माहितीपत्रके यांच्या माध्यमातून करून देण्यात आली. माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत गूगल फॉर्मच्या माध्यमातून भाविकांकडून विसर्जन स्थळांची, वेळेची आगावू माहिती मिळवण्यात आली अशी माहिती सहाय्यक आयुक्त धोंडे यांनी  शेवटी दिली.

 

टॅग्स :गणेशोत्सवमुंबईमुंबई महानगरपालिका