Join us

मत्स्य व्यवसाय विभागात नावीन्यपूर्ण ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:06 AM

नवाब मलिक, अस्लम शेख यांच्या हस्ते प्रारंभलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी ...

नवाब मलिक, अस्लम शेख यांच्या हस्ते प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या वतीने ‘महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज’ उपक्रमाचा प्रारंभ रोजगार व उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते व पालकमंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मत्स्य व्यवसाय विभागातील समस्या जाणून घेणे आणि त्यावर नावीन्यपूर्ण उपाय शोधणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधून शनिवारी त्यांचे आयोजन करण्यात आले. मासे पकडणे, उत्पादन आणि मासे प्रक्रियेसंदर्भातील सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बाबींच्या आकलनानंतर विविध समस्या, आव्हाने समोर आली, जी स्टार्टअपच्या आधारे काही नवीन पद्धतीने सोडवली जाऊ शकतात.

या उपक्रमात जगभरातील नवउद्योजक सहभागी होऊ शकतात. मोठ्या आकाराच्या फिशपॉन्डचे स्वयंचलितीकरण मत्स्यपालन प्रणाली आणि बायोफ्लॉक (बीएफ) तंत्रज्ञानाची पुनर्रचना, बोटी, हार्बर आणि जेट्टीसाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर, माशांच्या कचऱ्याचा प्रभावी उपयोग या प्रमुख समस्यांवर उपाय सुचविण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता https://www.msins.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्यासह नवउद्योजक, स्टार्टअप्सचे प्रतिनिधी, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.