लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खारमध्ये जान्हवी कुकरेजा (१९) या विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दिया पडळकर हिने चौकशीत त्या रात्री भगवती हाईट्स इमारतीमध्ये काय घडले, याचा उलगडा पोलिसांसमोर केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता श्री जोगधनकर याच्या जबाबानंतर संपूर्ण घटनाक्रम उघड करण्यात पोलिसांना यश येईल, असा दावा केला जात आहे.
गेल्या चार दिवसांपासून नशेत असल्याचे कारण देत काही आठवत नसल्याचा दावा श्री आणि दिया यांनी केला होता. सध्या श्रीवर उपचार सुरू असल्याने पोलीस दियाकडे याबाबत चौकशी करीत आहेत. तिच्या चौकशीत जान्हवीची हत्या का आणि कशी करण्यात आली, यामागचे सत्य तपास अधिकाऱ्यांना समजल्याची माहिती मिळत आहे. दिया हिने त्या रात्री नेमके काय घडले होते, याचा घटनाक्रम पोलिसांसमोर उलगडला आहे. त्यामुळे आता श्रीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याची चौकशी केली जाणार आहे. त्याचा जबाब आणि दियाने सांगितलेला घटनाक्रम याची पडताळणी केली जाणार आहे, असे सांगण्यात आले.
हत्येमागे तिसरी व्यक्ती नाहीच
जान्हवीची हत्या झाली त्यापूर्वी तिने तिच्या काही मित्र-मैत्रिणींसोबत फोनवर बोलणे केले होते. त्यांच्याकडेही पोलिसांनी चौकशी केली असून त्यात तिने मित्राकडे आपले मन हलके केल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दिया व श्रीव्यतिरिक्त अजून तिसऱ्या व्यक्तीचा यात सहभाग असण्याची शक्यताही पोलिसांनी फेटाळली आहे.