लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब आणि त्यांच्या विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचे आरोप करणारे निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनी त्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने ही याचिका ८ ऑक्टोबर रोजी सुनावणीस ठेवत असल्याचे बुधवारी सांगितले.
व्ही. पी. राणे यांनी महिनाभरापूर्वी पाटील यांच्यावतीने ही याचिका केली होती. सीबीआय किंवा तत्सम तपास यंत्रणेमार्फत ही चौकशी केली जावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. लाच घेणे, बढती आणि बदलीच्या प्रकरणात भ्रष्टाचार करणे, गैरव्यवहार करणे असे आरोप पाटील यांनी परब आणि विभागातील अधिकाऱ्यांवर केले आहेत.
मे महिन्यात पाटील यांनी परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे आणि आणखी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केले होते. त्यानंतर त्यांना खात्यातून निलंबित करण्यात आले होते.