बडोलेंच्या दालनातील मारहाणीची चौकशी करा, लोकमतच्या वृत्ताचे पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 05:08 AM2018-09-13T05:08:17+5:302018-09-13T05:09:15+5:30
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या दालनात एका शिक्षण संस्थाचालकाने लाचेच्या पैशावरून अधिकाऱ्यास केलेल्या हाणामारीचे बुधवारी तीव्र पडसाद उमटले.
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या दालनात एका शिक्षण संस्थाचालकाने लाचेच्या पैशावरून अधिकाऱ्यास केलेल्या हाणामारीचे बुधवारी तीव्र पडसाद उमटले.
हे प्रकरण गंभीर असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. तर या प्रकरणी आपण स्वत: चौकशी करून योग्य ती कार्यवाही करु, असे बडोले यांनी
स्पष्ट केले.
यासंदर्भात बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल सर्वच वृत्तवाहिन्यांनी घेतली. संस्थाचालक अरुण निठुरे हे आरोपांवर ठाम असून आपण अन्य काही जणांनाही पैसे दिल्याचा आरोप करीत त्यांनी बडोले यांचे कार्यालय अधिकच संशयाच्या घेºयात आणले आहे. मात्र, निठुरे यांची मानसिक स्थिती तपासली पाहिजे.
नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. ते काँग्रेसचे पदाधिकारी होते. नियमबाह्य शाळेला मान्यता देण्याचा त्यांचा आग्रह असून त्यासाठी ते दबाव आणत असल्याचे मंत्री बडोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान पैसे घेऊन काम करणारा कर्मचारी व मंत्री यांचा काही संबंध आहे का? हे पैसे कोणासाठी घेतले जात होते याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
>विखे, मुंडेंचा हल्ला
या सरकारमध्ये आता लोक मंत्रालयात घुसून मंत्र्यांच्याच दालनात त्यांच्या अधिकाºयांना मारहाण करू लागले आहेत. या सरकारने पारदर्शक कारभाराचे आश्वासन दिले होते. मंत्रालयात नेमका कसा कारभार सुरू आहे, ते आता अगदी पारदर्शक पद्धतीने समोर आले आहे. आज भ्रष्ट पीएंना मारहाण होते. हीच वेळ उद्या मंत्र्यांवरही ओढवू शकते, असा इशारा विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी दिला. मुंडे यांनी या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशीची मागणी केली. लोक उघड उघड पैसे दिल्याचे सांगून मंत्र्यांच्या दालनात जाऊन जाब विचारत आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशावरून मंत्र्यांच्या दालनात हाणामारी होत आहे. हे राज्य भ्रष्टाचाराच्या बाबतीत किती पुढे गेले आहे हे स्पष्ट होत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.