लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची थट्टा उडवणाऱ्या महापालिकेतील भुतांच्या गोष्टीने सध्या चर्चेला उधाण आले आहे. महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील भुताटकीची खोडसाळ माहिती पसरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने महापौर विश्वनाथ महाडेश्वर व आयुक्त अजय मेहता यांच्याकडे केली आहे. या भूत प्रकरणाची राज्यात लागू असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार चौकशी करावी, अशी मागणीही आझाद मैदान पोलीस स्टेशनकडे करण्यात आलीे. प्रशासनानेही याची गंभीर दखल घेतल्याचे समजते. मुंबई महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग दुसऱ्या मजल्यावर सुरू केल्यापासून मुंबईत आगीच्या मोठ्या घटना घडल्याचे फोन येणे, रात्रीच्या वेळी कर्मचाऱ्यांना कमी-अधिक कर्मचारी दिसणे, काचांचा आवाज येणे, चालण्याचा आवाज येणे असे विचित्र भास होत असल्याचा दावा कर्मचारी करीत आहेत. हे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशांती आणि पूजा केल्यानंतर हे प्रकार कमी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र ही गोष्ट बाहेर पडताच कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही काम पूर्ण करण्यासाठी बसणारे कर्मचारी पळ काढू लागले आहेत. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या या प्रकाराची तत्काळ चौकशी व्हावी, अशी आरपीआयची मागणी आहे.
महापालिकेतील ‘भुता’ची चौकशी करा
By admin | Published: May 24, 2017 2:00 AM