मुंबई : सॅटेलाईटच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून चालणारे व्हर्च्यूअल क्लासेस आता इंटरनेटच्या माध्यमातून चालवण्यासाठी मुंबई महापालिका टेंडर आणत असून हे इंटरनेट प्रेम कशाच्या मोहापायी आहे, असा सवाल भाजपाचे अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला.मुंबईवरील चर्चेत बोलताना अॅड. शेलार म्हणाले, मुंबई पालिका जवळपास ८ वर्षांपासून व्हर्च्यूअल क्लासेस आयोजित करत आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून मुंबई पालिकेच्या सर्व शाळांना जोडणारा हा उपक्रम राज्यात एकमेव आहे. मात्र कंत्राटदारांच्या स्वार्थासाठी आता हे कंत्राट सॅटेलाईट सोडून इंटरनेटसाठी केले जात आहे. सॅटेलाईटच्या माध्यमातून बॅन्डविड्थ चांगली मिळते. अनेक ठिकाणी एकाचवेळी जर थेट प्रक्षेपण करायचे असेल तर त्यासाठी सॅटेलाईट उपयोगी ठरते. ‘मध्यवर्ती नेटवर्क नियंत्रण यंत्रणा’ ही सॅटेलाईटद्वारे नियंत्रित करता येते. असे असताना महापालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे काम इंटरनेटच्या साहाय्याने करण्याचे टेंडर आणले आहे. यामागे नेमके कोण आहे, कोणाचे हित जोपासले जात आहे, याची चौकशी करावी, अशी मागणीही शेलार यांनी या वेळी केली.
महापालिकेच्या इंटरनेट प्रेमाची चौकशी करा; आशिष शेलार यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 5:39 AM