लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : दिवंगत जमील शेख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि सूत्रधार यांना तत्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करून महापालिका अधिकाऱ्यांची चौकशी करावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, शासकीय विश्रांतिगृहाजवळ मंगळवारी मनसेने ‘मूक धरणे’ आंदोलन केले. तसेच पोलीस आयुक्तांना या मागणीचे निवेदनही दिले आहे.
जमील शेख यांची हत्या करणाऱ्या खऱ्या सूत्रधाराला पकडा, अशी मागणी मनसे उपाध्यक्ष जावेद शेख यांनी या वेळी केली. जमीलचा खून हा क्लस्टरविरोधातून झाला आहे. यात पालिकेच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी, या हत्येचे षडयंत्र राबोडीत घडले, मुख्य सूत्रधारही राबोडीतून होते, असा आरोप मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला. या वेळी जमील यांचे कुटुंब, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम, नैनेश पाटणकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक रहिवासी या आंदोलनात सहभागी झाले होते.