Join us

चौकशी करा, नाहीतर न्यायालयात जाऊ; फडणवीसांचे गृहमंत्री देशमुख यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 1:08 AM

फडणवीस यांनी म्हटले आहे की, ४ जुलैला आपण असेच चौकशीची मागणी करणारे पत्र आपल्याला दिले होते.

मुंबई : नागपुरातील साहिल सय्यद या व्यक्तीच्या कथित आॅडिओ क्लिपचे प्रकरण गाजत असून भाजपच्या दोन नेत्यांना हनिट्रॅपमध्ये अडकविण्याशी संबंधित असलेल्या व आपला उल्लेख असलेल्या या क्लिपची आपण चौकशी करणार नसाल तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्र्तींकडे ती क्लिप सादर करून चौकशीची विनंती करू, असे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहे.

फडणवीस यांनी म्हटले आहे की, ४ जुलैला आपण असेच चौकशीची मागणी करणारे पत्र आपल्याला दिले होते. त्याचे उत्तर आपल्यापर्यंत आलेले नाही पण समाजमाध्यमांमध्ये आपले उत्तराचे पत्र फिरत आहे. त्यात आपण ती व्यक्ती भाजपची कार्यकर्ता असल्याचा आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे माजी आमदार सुधाकर देशमुख यांचा तो व्यावसायिक भागिदार असल्याचा निष्कर्ष काढलेला आहे. मंत्रिपदाचे गांभीर्य असलेले नेते म्हणून मी आपल्याकडे पाहतो, पण ज्या पद्धतीने आपण माझ्या पत्राला उत्तर दिले आहे त्यातून एका गंभीर विषयाचे राजकारण सुरू आहे, असे खेदाने म्हणावे लागते.

सदर क्लिपमध्ये केवळ हनिट्रॅपचा विषय नाही तर गृहमंत्र्यांनी फोन केल्याने आरोपी सुटले, न्यायव्यवस्था कशी मॅनेज केली या संबंधीचे गंभीर विषय त्यात आहेत. याकडे दुर्लक्ष करून राजकारण केले जात असेल तर ते दुर्दैवी आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअनिल देशमुखपोलिस