वाझेंसोबतच वरुण सरदेसाई यांचीही चौकशी करा
नितेश राणे; आयपीएलच्या बेटिंग टोळीच्या खंडणीत हिस्सा मागितल्याचा आराेप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्याेगपती अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी सचिन वाझे यांच्यासोबत युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचीही चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) करावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. वाझे यांनी आयपीएलमध्ये बेटिंग करणाऱ्या टोळ्यांकडून खंडणी मागितली होती. या खंडणीत सरदेसाई यांनी हिस्सा मागितल्याचा आरोपही राणे यांनी सोमवारी केला.
भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेटिंगचे रॅकेट चालते. या सर्व बेटिंगवाल्यांना सचिन वाझे यांनी फोन करून मोठ्या खंडणीची मागणी केली होती. छापा किंवा अटक टाळायची असेल तर १५० कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी वाझेंनी केली होती. वाझेंनी बेटिंगवाल्यांना फोन केल्यानंतर वाझेंना वरुण सरदेसाई यांनी फोन केला. तुम्ही बुकींकडे जे पैसे मागितले त्यातील आमचा हिस्सा किती? असे सरदेसाई यांनी वाझे यांना विचारल्याचा म्हणजे एक प्रकारे खंडणी मागितल्याचा आरोप राणे यांनी केला. त्यामुळे एनआयएने वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांच्यात झालेले कॉल रेकॉर्ड, त्यांचे संभाषण आणि सीडीआर तपासावे, अशी मागणी राणे यांनी केली.
आपल्या नातेवाइकाला वाचविण्यासाठी मुख्यमंत्री वाझेंना पाठीशी घालत आहेत का, असा प्रश्न करतानाच ठाकरे सरकारने कोणत्याच घटनात्मक पदावर नसलेल्या सरदेसाई यांना वायप्लस दर्जाची सुरक्षा पुरवली. शासकीय बैठकांनाही ते उपस्थित असतात. अनेक अधिकाऱ्यांना ते थेट दूरध्वनी करतात. अशा सरदेसाईंनी वाझे यांच्याशी कोणत्या कारणासाठी किती वेळा संपर्क साधला याचीही चौकशी एनआयएने करावी, असे राणे म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयानंतर निलंबित झालेल्या वाझेंना जूनमध्ये कोरोना काळात कमी मनुष्यबळाचे कारण देत पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यांना सेवेत पुन्हा घेण्याची शिफारस करणाऱ्या समितीत कोण-कोण होते याची माहिती जाहीर होणे आवश्यक आहे, अशी मागणीही राणे यांनी केली.
....................