तुमच्या शॅडो गृहमंत्र्यांकडून चौकशी करा, रुपाली चाकणकरांचा मनसेला टोला
By महेश गलांडे | Published: February 23, 2021 02:05 PM2021-02-23T14:05:25+5:302021-02-23T14:12:18+5:30
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी व्हावा म्हणून राज्य सरकार कोरोनाची खोटी आकडेवारी जाहीर करतंय असं मनसेच्या संदीप देशपांडे याचं स्टेटमेंट ऐकण्यात आलं.
मुंबई - गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra ) संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या मुद्द्यावरून मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीबाबत शंका घेत जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवू नका, असा इशारा राज्य सरकारला दिला. त्यावरुन राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मनसेची खिल्ली उडवली.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी व्हावा म्हणून राज्य सरकार कोरोनाची खोटी आकडेवारी जाहीर करतंय असं मनसेच्या संदीप देशपांडे याचं स्टेटमेंट ऐकण्यात आलं. मला वाटतं आपल्या शॅडो मंत्रिमंडळातील जे कुणी शॅडो गृहमंत्री आहेत त्यांच्याकडून याची चौकशी समिती नेमून योग्य ती शॅडो कारवाई करण्यात यावी, असं खोचक ट्विट चाकणकर यांनी केलंय.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी व्हावा म्हणून राज्य सरकार कोरोनाची खोटी आकडेवारी जाहीर करतंय असं मनसेच्या @SandeepDadarMNS याचं स्टेटमेंट ऐकण्यात आलं.(1/2)
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 22, 2021
काय म्हणाले होते संदीप देशपांडे
संदीप देशपांडे म्हणाले की, सावधान सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे, त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. या आरोपानंतर अनेक मविआ समर्थक मला ट्रोल करतील, पण जे सत्य आहे ते बोलणारच, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे. राज्यात कोरोनाचे असे कुठले आकडे वाढले आहेत, हा प्रश्न आहे. कृपया जनतेला भीती घालू नका. विधिमंडळाचे अधिवेशन घ्यायचे नसेल तर नका घेऊ. अध्यक्षांची निवड करायची नसेल तर नका करू. पण लोकांना भीती कशाला घालताय, असा सवाल देशपांडे यांनी विचारला. तसेच सध्या राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांना कोरोना कसा काय होतोय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
शेतकरी आंदोलनात का नाही कोरोना
तिकडे शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे. मात्र तिकडे कोरोना नाही आहे. अमरावतीत कोरोनाच्या जास्त टेस्ट घ्यायच्या आणि कोरोना वाढल्याचे सांगायचे. गेल्या चार महिन्यात राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. पेट्रोल दरवाढीवर आंदोलन झालं तेव्हा कोरोना पसरला नाही. बसमध्ये चेंगरून लोक प्रवास करताहेत, तेव्हा कोरोना कसा काय नाही झाला. अधिवेशनाच्याच काळात कोरोनाचा फैलाव होतो आहे, अशी शंका देशपांडे यांनी उपस्थित केली. राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी काल जनतेला दिली होती.