- डिप्पी वांकानी, मुंबईकांदिवली दुहेरी खून प्रकरणी पोलीस आता तामिळनाडू-राजस्थानातील फारसे परिचित नसलेल्या कलावंतांशी संपर्क साधत आहेत. या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी विद्याधर राजबहार याने चरितार्थासाठी या कलावंतांकडे पैसे मागितले काय, हे जाणून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. विद्याधरकडे केवळ सहा हजार रुपये होते. त्याने दक्षिणेतील अनेक कलावंतांसाठी फॅब्रिकेशनचे काम केलेले आहे. त्यामुळे त्याने या कलावंतांकडे पैशाची मागणी केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे. दुहेरी खून प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने चिंतन उपाध्याय याला अटक केली आहे. आता चिंतनच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आली असून तो न्यायालयीन कोठडीत जाईल. तोपर्यंत विद्याधरला अटक न झाल्यास या दोघांची एकत्रित चौकशी करणे कठीण होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. विद्याधरने ज्यांचे काम केलेले आहे अशा प्रमुख कलावंतांना या खुनाची माहिती आहे; पण त्यांना विद्याधर फरार असल्याची माहिती नसावी. त्यामुळे त्यांना विद्याधर फरार असल्याबाबत सावध करण्यात येत आहे. चिंतनची पोलीस कोठडी संपुष्टात आल्यानंतर विद्याधर सापडला, तर दोघांना समोरासमोर बसवून त्यांची एकत्रित चौकशी करणे कठीण होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. न्यायालयाने चिंतनला दहा दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यानंतर पोलीस त्याची कोठडी फार तर आणखी चार दिवस वाढवून घेऊ शकतील. त्यामुळे या दहा दिवसांत विद्याधरला अटक होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास दोघांची एकत्रित चौकशी करता येईल; परंतु जर विद्याधर पकडला गेला नाही, तर पोलीस उर्वरित चार दिवस राखीव ठेवून त्याच्या अटकेनंतरच पुन्हा चिंतनच्या कोठडीची मागणी करतील. दरम्यान, गुन्ह्यापूर्वी चिंतनने त्याच्या बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम काढली किंवा काय हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्या बँक खात्यांची तपासणी केली. तथापि, त्याने त्याच्या एकाही बँक खात्यातून अलीकडे मोठी रक्कम काढल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे त्याने गुन्ह्यासाठी स्वत:कडील रोख रक्कम अॅडव्हान्स म्हणून विद्याधरला दिली असेल, असा संशय आहे. व्हॉट्सअॅप कॉलिंगच्या वापराचा संशय विद्याधरने पळून जाताना स्वत:कडील मोबाइल आणि सिमकार्ड फेकून दिले असावे; मात्र त्याने नवा मोबाइल आणि नवे सिमकार्ड खरेदी केले असण्याची शक्यता आहे. त्याने त्याच्या ओळखीच्या कोणाशीही फोनवरून संपर्क केलेला नाही; मात्र तो व्हॉट्सअॅप कॉलिंगचा वापर करून ज्यांच्यावर पोलिसांचा संशय नाही, अशा ओळखीच्या लोकांशी संपर्क साधू शकतो, असे पोलिसांना वाटते.
तामिळनाडू, राजस्थानातील कलावंतांची चौकशी
By admin | Published: December 27, 2015 1:06 AM