एफवाय प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू
By admin | Published: June 3, 2017 05:25 AM2017-06-03T05:25:16+5:302017-06-03T05:25:16+5:30
बारावीनंतर विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पूर्वप्रवेश नोंदणी करणे अनिवार्य
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बारावीनंतर विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पूर्वप्रवेश नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. गुरुवारपासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत या प्रक्रियेत कोणतेही अडथळे आलेले नाहीत. दोन दिवसांत आॅनलाइन प्रक्रियेत ६५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले.
आॅनलाइन पूर्वप्रवेश नोंदणीला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. विद्यार्थ्यांना नोंदणीत कोणतीही अडचण आलेली नाही. दोन दिवसांमध्ये एकूण ३७ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर, ६५ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष बीए, बीए (फ्रेंच स्टडी, जर्मन स्टडी), बीकॉम, बीएससी, बीएमएम, बीएसडब्ल्यू, बीएससी (आयटी), बीएससी (नॉटिकल सायन्स), बीएससी (होम सायन्स), बीएससी (एव्हिएशन), बीएससी (फॉरेन्सिक सायन्स), बीएससी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीकॉम (बी अॅण्ड आय), बीकॉम (ए अॅण्ड एफ), बीकॉम (एफ अॅण्ड एम), बीएमएस, बीएमएस - एमबीए, बीव्होक, लायब्ररी सायन्स अशा अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी अनिवार्य आहे.
विद्यापीठाचे आवाहन
आॅनलाइन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील पूर्वप्रवेशासाठी एक विशेष लिंक दिली आहे. या लिंकवर क्लिक करून अर्ज भरायचा आहे. अर्ज भरताना अडचणी आल्यास ९३२६५५२५२५ या विद्यापीठाच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.