पेपर चोरी प्रकरणी शिक्षकांची चौकशी
By admin | Published: April 13, 2017 03:15 AM2017-04-13T03:15:21+5:302017-04-13T03:15:21+5:30
दहिसरच्या इस्र शाळेतून दहावीच्या न तपासलेल्या उत्तरपत्रिका गायब झाल्या आहेत. याप्रकरणी पोलीस आता शिक्षकांची चौकशी करत असून आजूबाजूच्या परिसरातील भंगारवाल्यांचा
मुंबई : दहिसरच्या इस्र शाळेतून दहावीच्या न तपासलेल्या उत्तरपत्रिका गायब झाल्या आहेत. याप्रकरणी पोलीस आता शिक्षकांची चौकशी करत असून आजूबाजूच्या परिसरातील भंगारवाल्यांचा शोधही घेतला जात आहे.
शाळेचे प्राध्यापक नरेंद्र पाठक हे काही वेळासाठी बाहेर गेले. त्याच दरम्यान अनोळखी इसमाने भंगारवाला बनून या ५१६ उत्तरपत्रिका लंपास केल्या. यावरून शाळेतील कोणीतरी व्यक्ती त्याला सामील असल्याचा संशय पोलिसांना व्यक्त केला आहे. ३ एप्रिल रोजी पाठक हे त्यांच्या केबिनमध्ये नसल्याची माहिती आतील व्यक्तीने संशयित आरोपीला पुरवली आहे. त्यानुसार त्याने ती वेळ साधली आणि बरोबर त्याने न तपासलेल्याच उत्तरपत्रिकांचा गठ्ठा उचलून पळ काढला. यामुळे पोलीस शाळेच्या शिक्षकांची चौकशी करत आहेत.
भंगार विक्री करणाऱ्या लोकांकडे देखील तपास करण्यात येत आहे. पेपर पळविणारा इसम हा भंगारवाला बनून आला असला तरी तो भंगारवालाच असेल असे नक्की सांगता येत नाही. त्यामुळे आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासात आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शीकडे देखील विचारणा सुरु असल्याचे दहिसर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अद्याप याप्रकरणी ठोस असा पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
इतिहास, संस्कृत आणि विज्ञान विषयांच्या चोरी उत्तरपत्रिका गायब झाल्या आहेत. याप्रकरणी शाळेकडून पोलिसांना संपुर्ण सहकार्य करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही - बोर्ड
शाळेतून चोरीला गेलेल्या उत्तरपत्रिका न सापडल्यास विद्यार्थ्यांना योग्य ते गुण दिले जाणार असून त्यासाठी गोपनीय पद्धत राबविण्यात येत आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दतात्रय जगताप यांनी दिली. याप्रकरणी, पोलिसांच्या तपासाबरोबरच बोर्डाकडून ही समिती नेमण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यपकांवर कारवाई करण्याचे संकेत देतानाच यात कोणत्याही विद्यार्थ्यांचा संबंध नसल्याची शक्यता जगताप यांनी वर्तविली आहे. तर, उत्तरपत्रिका चोरी प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.