भ्रष्टाचाराची चौकशी सुरू
By admin | Published: June 13, 2015 11:22 PM2015-06-13T23:22:47+5:302015-06-13T23:22:47+5:30
महाड तालुक्यातील खर्डी गावातील पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामात २२ लाखांचा अपहारप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अलिबाग : महाड तालुक्यातील खर्डी गावातील पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामात २२ लाखांचा अपहारप्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी गेल्या चार महिन्यांत महाड तालुका पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
‘लोकमत’ने हे प्रकरण गेल्या १२ फेब्रुवारी रोजी उजेडात आणले. आता हे प्रकरण राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे असून या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
खर्डी गावातील बाधित शेतकरी संदेश उदय महाडिक यांनी रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या प्रकरणी चौकशीचे आदेश प्राप्त झाल्याप्रमाणे संदेश महाडिक यांचा जबाब नोंदवून घेतला असल्याची माहिती रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुनील कलगुटकर यांनी दिली.
चौकशीच्या पुढील टप्प्यात खर्डी पाणलोट विकास प्रकल्प राबविणाऱ्या वनराई संस्था, पुणे या संस्थेचे पदाधिकारी, शासनाचे नियंत्रण अधिकारी असणारे महाड कृषी अधिकारी, खर्डी पाणलोट समितीचे अध्यक्ष चंद्रकांत रामचंद्र महाडिक, समिती सचिव सचिन मधुकर महाडिक, सदस्य बाळाराम महादेव महाडिक, सदस्य मधुकर सखाराम महाडिक, सदस्य शांताराम सखाराम महाडिक, सदस्य पांडुरंग गोविंद महाडिक, सदस्य अनंत पांडुरंग शिंदे, सदस्य वैशाली विजय महाडिक, सदस्य सुलोचना रामभाऊ महाडिक, सदस्य लक्ष्मी रामचंद्र महाडिक, सदस्य छाया शांताराम महाडिक, सदस्य सुनिता सुधाकर पंदेरकर, खर्डी ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम तुकाराम महाडिक, ठेकेदार अनिता रमेश मोहिते (रा.महाड) व वनराई वसुंधरा पाणलोट प्रकल्प अधिकारी जयवंत विठ्ठल देशमुख (रा.वरंध) आदींसह अन्य सर्व संबंधितांना चौकशीकरिता बोलावण्यात येणार असल्याचे कलगुटकर यांनी सांगीतले.
संदेश उदय महाडिक व बाबासाहेब गोविंद महाडिक यांनी दोन स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या परंतु महाड तालुका पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी धरणे व उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर तथाकथित बंधारे व अन्य कामांचे पंचनाम्याचे काम कृषी विभागाने सुरु केले. परंतु समितीने न केलेली काम दाखवण्यात येऊ लागल्याने त्यावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. याप्रकरणी ५ जून रोजी महाडचे तहसीलदार एस. बी. कदम यांना निवेदन दिल्याचे बाधित शेतकरी संदेश महाडिक यांनी सांगितले.