अजय मेहता यांच्यावरील आरोपांची चौकशी
By admin | Published: March 24, 2016 01:47 AM2016-03-24T01:47:24+5:302016-03-24T01:47:24+5:30
महावितरणचे माजी व्यवस्थापकीय संचालक आयुक्त अजय मेहता यांच्यावर सदस्यांनी केलेल्या अनियमितता व भ्रष्टाचाराच्या आरोपांची दखल राज्य सरकारने घेतली आ
मुंबई : महावितरणचे माजी व्यवस्थापकीय संचालक आयुक्त अजय मेहता यांच्यावर सदस्यांनी केलेल्या अनियमितता व भ्रष्टाचाराच्या आरोपांची दखल राज्य सरकारने घेतली आहे. मेहता यांच्यावरील सर्व अरोपांची तीन महिन्यात चौकशी केली जाईल, अशी घोषणा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत केली. चौकशी कुणामार्फत करायची हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जाहीर केले जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले. मेहता हे सध्या मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत.
विरोधी पक्षातर्फे नियम २९३ अन्वये ऊर्जा विभागावरील चर्चा उपस्थित केली होती. चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांनी अजय मेहता यांच्या महावितरणमधील कारभारावर प्रश्न उपस्थित करीत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी यापूर्वीही मेहता यांच्याबाबतची एक फाईल ऊर्जामंत्र्यांकडे सोपविली होती. विरोधी पक्षनेत्यांनी सादर केलेली कागदपत्रे व झालेले आरोप या अनुषंगाने मेहता चौकशी केली जाईल, असे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
अदानी पॉवरवर मेहरबानी का?
महापारेषण व अदानी पॉवर यांनी संयुक्तपणे तिरोडा (गोंदिया), तिडंगी (नागपूर) ते अकोला या दरम्यान टॉवर उभारून वीज वाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले. मात्र, मध्येच महापारेषण यातून बाहेर पडत अदानी पॉवरला हे संपूर्ण काम सोपविले. या कामावर आलेल्या खर्चाचा हिशेब वीज नियामक आयोगाकडे सादर करून आता महापारेषणतर्फे दरवर्षी अदानीला मोठी रक्कम दिली जात आहे. ही मेहरबानी का, असा सवाल करत वीज नियामक आयोगाकडे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांनी सादर केलेल्या हिशेबाचे अंकेक्षण करण्याची मागणी सुनील केदार यांनी चर्चेदरम्यान केली.
त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी उत्तर देताना अजय मेहता यांनी विजेची आॅनलाईन खरेदी, शॉर्ट टेंडर प्रक्रिया आदी चांगली कामे केल्याचे प्रशस्तीपत्रही दिले. (प्रतिनिधी)