वाढीव एफएसआय प्रकरणाची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 02:47 AM2017-12-05T02:47:54+5:302017-12-05T02:47:54+5:30
अतिरिक्त एफएसआयद्वारे वाढीव रूम देण्याचे आश्वासन देऊन गृहनिर्माण सोसायटीने सभासदांची दिशाभूल केल्याच्या तक्रारीवरून अखेर तीन वर्षांनी या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी तक्रारदाराचा जबाब नोंदवला.
मुंबई : अतिरिक्त एफएसआयद्वारे वाढीव रूम देण्याचे आश्वासन देऊन गृहनिर्माण सोसायटीने सभासदांची दिशाभूल केल्याच्या तक्रारीवरून अखेर तीन वर्षांनी या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी तक्रारदाराचा जबाब नोंदवला.
मालाड (पूर्व) येथील कैलासचंद्र सोसायटीतील इमारतींपैकी ई, सी आणि एच या इमारतींमध्ये ११३ सदनिका आहेत. या ११३ सदनिकाधारक सभासदांनी अतिरिक्त रूम पाहिजे असल्याची मागणी सोसायटीकडे केली होती. त्यानुसार सोसायटीने तोंडी निविदा मागवल्या. त्यापैकी एका कंत्राटदाराने अंदाजित पाच लाख रुपये प्रत्येक सदनिकाधारकामागे खर्च येईल, असे सांगितले. त्यानुसार अतिरिक्त रूमसाठी एकूण ३ कोटी ९५ लाख रुपये खर्च मान्य करून जानेवारी २0१४ मध्ये सोसायटीने ११३ सदनिकाधारकांकडून एकूण ७९ लाख रुपये आगाऊ रक्कम जमा केल्याची तक्रार या सोसायटीतील रहिवासी राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी केली होती.
त्यानंतर बरेच महिने काहीही कामकाज न झाल्याने काही सभासदांनी चौकशी केली असता सोसायटीत कोणत्याच प्रकारचा वाढीव एफएसआय नसल्याचे समजले. ११३ सभासदांनी ७९ लाख रुपयांबाबत विचारणा केली असता त्या रकमेत आर्किटेक्टनी अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाचे प्रमाणपत्र मिळवून दिल्याची माहिती सोसायटी सभासदांना देण्यात आली, असे तक्रारीत नमूद आहे.
याबाबत मोहन कृष्णन यांनी या अतिरिक्त एफएसआय प्रकरणाबाबत सहकारमंत्री, विभागीय सहनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी केल्या असता त्यांनी याबाबत चौकशी करून तक्रारदाराला परस्पर उत्तर द्यावे, असे आदेश उपनिबंधकांना दिले. मात्र दोघा अधिकाºयांची याबाबत नेमणूक करण्यात आली असली तरी पुढील तपशिलाबाबत काही समजू शकले नसल्याचे कृष्णन यांनी सांगितले. नुकतीच दिंडोशी पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक एस.ए. म्हस्के यांनी आपला जबाब नोंदवून घेतल्याचे त्यांनी सांगितले.