महिला अधिकाऱ्याला गाणे गायला लावले, अतुल सावेंनी दिले चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 05:40 AM2022-10-31T05:40:12+5:302022-10-31T05:40:23+5:30
दोन अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी निलंबित केल्याचा दावा समाज माध्यमांमध्ये केला जात आहे.
मुंबई : एका महिला अधिकाऱ्याला अवर सचिवांनी गाणे गायला लावल्याच्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
१८ ऑक्टोबर रोजी ही घटना घडल्याचे म्हटले जाते. मी विभागाच्या प्रमुखांच्या (अधिकारी) दालनात गेले असता तेथे उपस्थित विभागाच्या अवर सचिवांनी मला गाणे गायला लावले. ‘बोअर झाले आहे तेव्हा मॅडम तुम्ही गाणे गा’ असे त्यांनी आपल्याला म्हटल्याची लेखी तक्रार या महिला अधिकाऱ्याने मंत्री सावे यांच्याकडे केली.
मंत्र्यांचे ओएसडीदेखील त्या ठिकाणी होते असे महिला अधिकाऱ्याने तक्रारीत म्हटले आहे. सावे यांनी चौकशीचे आदेश दिले, असे समजते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एका निवेदनात म्हटले की, याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी निलंबित केल्याचा दावा समाज माध्यमांमध्ये केला जात आहे. लेखी आदेश निघत नाही तोवर प्रकरणाचा पाठपुरावा करू.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, अशाप्रकारे महिला अधिकाऱ्याला गाणे गायला लावणे हा एकप्रकारे त्या महिलेचा विनयभंगच आहे. हा संतापजनक प्रकार आहे. सावे यांच्या कार्यालयाने सांगितले की, चौकशीचे आदेश दिलेले आहेत..