Join us

नवनीत राणांबाबत घडलेल्या कोठडीतील गैरवर्तनाची चौकशी करणार- दिलीप वळसे-पाटलांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 6:09 PM

फडणवीसांच्या या आरोपानंतर आता याबाबत राज्य सरकारनेही चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.

मुंबई- खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. राणा दाम्पत्यानं त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी याचिकेतून केली होती. मात्र ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. एकाच दिवशी दोन घटना घडल्यानं दोन एफआयआरची गरज काय, असा प्रश्न राणा दाम्पत्याकडून उपस्थित करण्यात आला होता. आमच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन एफआयआर एकत्र करा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्याच आली. मात्र ती मागणी न्यायालयानं फेटाळून लावली आहे. मात्र सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाची चर्चा सुरु आहे. 

नवनीत राणा यांना तुरुंगात अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. नवनीत राणांना पिण्याचं पाणी देखील दिलं गेलं नाही. इतकंच काय तर त्यांना वॉशरुमलाही जाऊ दिलं नाही. हे अत्यंत धक्कादायक आहे", असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला. नवनीत राणांना तुरुंगात दिली जात असलेली वागणूक हा राज्याच्या लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे. लोकशाहीबद्दल ओरडणारे आता आहेत कुठे? नवनीत राणा यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून लोकसभेच्या सभापतींकडे त्यांना तुरुंगात दिली जात असलेल्या वागणुकीबाबत तक्रार केली आहे", असंही फडणवीस म्हणाले. 

फडणवीसांच्या या आरोपानंतर आता याबाबत राज्य सरकारनेही चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. नवनीत राणांबाबत घडलेल्या कोठडीतील गैरवर्तनाची चौकशी करणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. 

दरम्यान, उच्च न्यायालयानं राणा दाम्पत्याला फटकारलं आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. घटनेनं तुम्हाला काही विशेषाधिकार दिले आहेत. अधिकारांसोबत जबाबदाऱ्या येतात. तुम्ही पोलिसांना सहकार्य करणं अपेक्षित होतं. तुम्हाला जर जबाबदाऱ्यांचा विसर पडला असेल तर मग तुमच्याविरोधात कारवाई गरजेची आहे, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी राणा दाम्पत्याला सुनावलं. 

टॅग्स :नवनीत कौर राणादिलीप वळसे पाटीलपोलिस