धारावीतील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पालिका शाळेत प्रवेश नाकारणाऱ्या मुख्याध्यापिकेची चौकशी
By रेश्मा शिवडेकर | Published: February 23, 2024 04:48 PM2024-02-23T16:48:35+5:302024-02-23T16:50:07+5:30
अहवाल सादर करण्याचे बालहक्क आयोगाचे आदेश.
रेश्मा शिवडेकर,मुंबई : शुल्क भरू न शकल्यामुळे धारावीतील खासगी शाळांनीशाळाबाह्य केलेल्या सात विद्यार्थ्यांना माटुंगा येथील सिटी ऑफ लॉस एंजल पालिका शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता. या प्रकाराची तक्रार महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाने महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाकडे केली होती. आयोगाने याची दखल घेत प्रवेश नाकारणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महासंघाचे नितीन दळवी व धारावीतील रहिवाशी श्रीनिवास कुचन यांनी हस्तक्षेप केल्यावर या सात मुलांना प्रवेश देण्यात आला. मात्र महासंघाने या प्रकारची तक्रार आयोगाकडे केली होती व प्रवेश नाकारणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आयोगाने याची दखल घेत शाळेच्या माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापकांची चौकशी करण्याचे आदेश मुंबई महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱयांना दिले आहेत.
कोरोना काळात शाळेचे शुल्क न भरता आल्याने अनेक मुले शाळाबाह्य झाली होती. असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षण विभागाने या मुलांना सरकारी व अनुदानित शाळेत शाळा सोडल्याच्या दाखल्याविना प्रवेश द्यावा व वयानुरूप वर्गांमध्ये सामावून घ्यावे, असे आदेश दिले होते. तरिही या मुलांना प्रवेश नाकारण्यात आला होता.