‘इस्माईल युसुफ’ प्रकरणाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 05:50 AM2018-06-10T05:50:37+5:302018-06-10T05:50:37+5:30

इस्माईल युसुफ कॉलेज प्रशासनावर टीका करीत काही दिवसांपूर्वी नापास विद्यार्थी आणि पालकांनी मंत्रालयावर धडक देत निकालाच्या न्यायासाठी शिक्षणमंत्र्यांचे दार ठोठावले होते.

 Inquiry of 'Ismail Yusuf' case | ‘इस्माईल युसुफ’ प्रकरणाची चौकशी

‘इस्माईल युसुफ’ प्रकरणाची चौकशी

Next

मुंबई - इस्माईल युसुफ कॉलेज प्रशासनावर टीका करीत काही दिवसांपूर्वी नापास विद्यार्थी आणि पालकांनी मंत्रालयावर धडक देत निकालाच्या न्यायासाठी शिक्षणमंत्र्यांचे दार ठोठावले होते. विद्यार्थ्यांच्या या मागणीची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गंभीर दखल घेतली असून लवकरच या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. मुंबईच्या फोर्ट भागात नुकत्याच स्थलांतरित झालेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आणि प्रवेश नियामक प्राधिकरण कार्यालयाची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी पाहणी केली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
जोगेश्वरी येथील इस्माईल युसुफ कॉलेजातील बारावी विज्ञान शाखेचे ५० टक्के विद्यार्थी नापास झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. कॉलेज प्रशासनाने प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण उशिराने पाठविल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप या कॉलेजातील विद्यार्थ्यांनी केला आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारी ४ जून रोजी मंत्रालयावर धडक देत शिक्षणमंत्र्यांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेव्हा शिक्षणमंत्र्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे या प्रश्नाबाबत शिक्षणमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर विद्यार्थ्यांना दिलासा देत शिक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी केलेली तक्रार मिळाली असून या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इतर कॉलेजांतील प्राध्यापकांकडून चौकशी
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आम्ही इतर कॉलेजांतील प्राध्यापकांकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे ठरविले आहे. या चौकशीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल, असे विनोद तावडे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

गैरप्रकार घडलेला नाही - प्राचार्या व्हवळा
कॉलेज प्रशासनाला यासंदर्भात विचारणा केली असता आम्ही चौकशीसाठी तयार आहोत, अशी प्रतिक्रिया प्राचार्या स्वाती व्हवळा यांनी दिली. कॉलेज प्रशासनाने आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली असून त्यात काहीही गैरप्रकार घडला नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Web Title:  Inquiry of 'Ismail Yusuf' case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.