चौकशी झालीच पाहिजे!

By admin | Published: October 2, 2015 01:28 AM2015-10-02T01:28:09+5:302015-10-02T01:28:09+5:30

नालेसफाईप्रमाणेच रस्त्याच्या कामांतही घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करण्यात यावी, असे पत्र महापौर स्नेहल आंबेकर यांनी आयुक्त अजय मेहता यांना पाठविल्यानंतर आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष

An inquiry should take place! | चौकशी झालीच पाहिजे!

चौकशी झालीच पाहिजे!

Next

मुंबई : नालेसफाईप्रमाणेच रस्त्याच्या कामांतही घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करण्यात यावी, असे पत्र महापौर स्नेहल आंबेकर यांनी आयुक्त अजय मेहता यांना पाठविल्यानंतर आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनीही या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी आयुक्तांकडे केली आहे. शिवाय रस्त्यावरील डांबर कंत्राटदार खातात की काय, ही मुंबईकरांच्या मनातील शंका चौकशीअंती दूर करा, असेही म्हटले आहे.
रस्त्याच्या खोदकामात डांबर, माती वाहून नेण्याच्या कामात गैरव्यवहार होत आहे. नालेसफाईतील गैरव्यवहारापेक्षा रस्त्यांची माती वाहून नेण्यात दहापट जास्त गैरव्यवहार होत आहे. रस्ते घोटाळ्यामुळे मुंबईकरांचे आर्थिक नुकसान होत असून, त्याचा मुंबईकरांवर आर्थिक बोजा पडतो आहे. ८० टक्के रक्कम कंत्राटदारांच्या खिशात जात आहे आणि या कामी कंत्राटदार आणि अधिकारी वर्गाचे साटेलोटे आहे, असे आरोप महापौरांनी पत्रात केले आहेत. त्यामुळे महापालिकेत भ्रष्ट अधिकारी, कंत्राटदार आणि भ्रष्ट कन्सल्टंट यांचे जे सिंडिकेट आहेत; ते जनतेसमोर आणावे, असे शेलार यांनी म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची सप्टेंबर २०१३ पासून ठरावीक कालमर्यादेत चौकशी झाली पाहिजे. ठरावीक कालमर्यादेत याचा अहवाल मुंबईकरांसमोर सादर केला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले आहे.
2013
सालापासून मुंबई महापालिकेत एक नवीन प्रक्रिया सुरू झाली. त्यापूर्वी रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारालाच रस्त्याचे खोदकाम आणि डांबर व माती वाहून नेण्याचे काम दिले जात होते. २०१३ पासून कन्सल्टंटने दिलेल्या सल्ल्यानुसार या कामाचे वेगळे पैसे कंत्राटदाराला देण्यात येऊ लागले. त्यामुळे भ्रष्टाचाराची सुरुवात या वेळच्या कन्सल्टंटच्या सल्ल्यापासून झाली आहे. म्हणून या प्रकरणाची चौकशी करायची झाल्यास ती सप्टेंबर २०१३ पासून त्या कन्सल्टंटसहित होणे गरजेचे आहे.

Web Title: An inquiry should take place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.