'महाराष्ट्रात अस्थिरता पसरवण्याचा डाव, फडणवीसांसह दिल्लीतील नेत्यांचा सहभाग'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 06:25 PM2020-05-20T18:25:31+5:302020-05-20T18:31:07+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची यांची भेट घेऊन मुंबईत कोरोनाच्या रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत, बेड उपलब्ध नाहीत, लोकांची उपासमारही होत आहे

'Inquiry to spread instability in Maharashtra, Delhi leaders including Fadnavis, says balasaheb thorat MMG | 'महाराष्ट्रात अस्थिरता पसरवण्याचा डाव, फडणवीसांसह दिल्लीतील नेत्यांचा सहभाग'

'महाराष्ट्रात अस्थिरता पसरवण्याचा डाव, फडणवीसांसह दिल्लीतील नेत्यांचा सहभाग'

googlenewsNext

मुंबई - राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या आणि मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा यावरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपाल महोदयांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीकेड लक्ष वेधत विविध मागण्या करण्यात येत आहेत. तर, भाजपाकडून २२ मे रोजी महाराष्ट्र बचाव आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. यावरुन, महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस संकटकाळातही राजकारण करत असल्याचं म्हटलंय. तसेच, राज्यात अस्थिरता पसरविण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचेही थोरात म्हणाले.  

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांची यांची भेट घेऊन मुंबईत कोरोनाच्या रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत, बेड उपलब्ध नाहीत, लोकांची उपासमारही होत आहे, असे आरोप सरकारवर केले आहेत. तर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २२ मे रोजी महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. गेल्या ६० दिवसांत राज्यात कोरोनाचा आकडा वाढत असून सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे, नागरिकांनीही २२ मे रोजी सकाळी ११ वाजता सरकारचा निषेध नोंदवावा, असे पाटील यांनी म्हटल आहे. भाजपाच्या या भूमिकेवरुन आता काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.  

देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते एकत्र मिळून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. थोरात यांनी बुधवारी 'झी २४ तास'शी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार आगपाखड केली. बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, राज्य कोरोनाच्या संकटात असताना भाजपला राजकारण सुचत आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचा दिलेला सल्ला या कटाचा भाग असल्याचा दावाही थोरात यांनी केला.

एकीकडे भाजपचे नेते राजकारण करायचे नाही, म्हणून सांगतात. पण देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते सातत्याने सरकार अडचणीत कसे येईल, हे पाहत आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यावर संकट आले असताना, त्याला सामोरे जायचे सोडून भाजप राजकारण करु पाहत आहे. भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही असून 'महाराष्ट्र बचाव' नव्हे तर 'भाजप बचाव' अशी त्यांची भूमिका असल्याचे सांगत भाजपाच्या आंदोलनावरही त्यांनी टीका केली. 

दरम्यान, कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटकाळात सरकार, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन सर्वजण मिळून लढत आहेत. पण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मात्र रोज राजभवनावर जाऊन सरकार विरोधात राज्यपालांना निवेदने देऊन राजकारण करत आहेत. या संकट काळात राजकारण न करता राज्याला केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी फडणवीस पुढाकार का घेत नाहीत? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.
 

Web Title: 'Inquiry to spread instability in Maharashtra, Delhi leaders including Fadnavis, says balasaheb thorat MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.