मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सावकारीच्या विळख्यामुळे त्रस्त झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना शुक्रवारी चौकशीसाठी बैठकीला बोलावले, मात्र पीडित कर्मचारी तेथे पोहोचले तर पालिका अधिकारीच गायब होते. सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाला कुलूप लागलेले होते. त्यामुळे कोणतीही बैठक न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या संतापात भर पडली.
न घेतलेल्या सावकारी कर्जाच्या वसुलीची चौकशी करण्याऐवजी एल वॉर्डच्या अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्याविरोधात मेमो काढण्याची भीती घालून आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यापाठोपाठ एल वॉर्डच्या सहाय्यक अभियंत्याने शुक्रवारी सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे यांच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले. त्यानुसार, कर्मचारी आपला लेखाजोखा घेऊन कार्यालयावर पोहोचले. मात्र, अधिकारीच अन्य ठिकाणी बैठकीला असल्याने आले नसल्याचे त्यांना समजले. तसेच कार्यालयाबाहेर असलेले टाळे पाहून त्यांना परतावे लागले.
सामाजिक संस्थेच्या ज्योती राठोड यांनी सह- मुख्य कामगार अधिकारी स्वप्निल सुराडकर यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली. मात्र, त्यांनीही शुक्रवारच्या बैठकीबाबत सांगितले नसल्याचे सांगितले. सुराडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना देखील शुक्रवारी बैठक घेणार असल्याचे सांगितले होते.
पोलिसांकडून चौकशी
‘लोकमत’च्या वृत्तानंतर आझाद मैदान पोलिसांनी तक्रारदार कर्मचारी सचिन बच्छाव यांच्याकडे पुन्हा अर्जाबाबत चौकशी केली. त्यानुसार, पोलीस स्तरावर देखील माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पोलीस प्रशासन यामध्ये काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.