कोविन ॲपवर डेटा अपलोड करणाऱ्या महिलेची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:06 AM2021-06-25T04:06:14+5:302021-06-25T04:06:14+5:30
कांदिवली बोगस लसीकरण; मोठे खुलासे होण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कांदिवली पोलिसांनी बोगस लसीकरण प्रकरणात आतापर्यंत सहाजणांना ...
कांदिवली बोगस लसीकरण; मोठे खुलासे होण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कांदिवली पोलिसांनी बोगस लसीकरण प्रकरणात आतापर्यंत सहाजणांना अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश असून तिची कसून चौकशी सुरू आहे. तिच्या चाैकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुडिया असे या महिलेचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. गुडिया कोविन ॲपवर डेटा अपलोड करण्याचे काम करायची. सर्टिफिकेट जनरेट करण्याची जबाबदारीही तिच्यावरच होती. त्यानुसार या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी आता कांदिवली पोलीस तिची चौकशी करत आहेत. तिच्यामार्फत या बोगस लसीकरणप्रकरणी मोठे खुलासे होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी डॉ. मनीष त्रिपाठी याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज (शुक्रवार, २५ जून) सुनावणी होणार आहे. त्याच्या वतीने ॲड. आदिल खत्री यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यास डॉ. त्रिपाठीला अटक करण्यात येईल आणि त्याच्याकडूनही बऱ्याच गोष्टींची उकल हाेईल, असे सूत्रांनी सांगितले.
कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीमध्ये ३० मे, २०२१ रोजी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले हाेते. जे बनावट असल्याचे नंतर उघडकीस आले. त्यानंतर कांदिवलीसह वर्सोवा, खार आणि बोरिवली पोलीस ठाण्यात एकूण चार दखलपात्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
......................................................