आयएनएस खंदेरी नौदलाकडे हस्तांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:21 AM2019-09-21T06:21:56+5:302019-09-21T06:22:04+5:30
दुसऱ्या स्कॉर्पिन प्रकारातील पाणबुडी असलेल्या आयएनएस खंदेरीचे गुरुवारी भारतीय नौदलाकडे हस्तांतरण करण्यात आले.
मुंबई : प्रोजेक्ट ७५ अंतर्गत माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) मध्ये तयार करण्यात आलेल्या दुसऱ्या स्कॉर्पिन प्रकारातील पाणबुडी असलेल्या आयएनएस खंदेरीचे गुरुवारी भारतीय नौदलाकडे हस्तांतरण करण्यात आले. मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प राबवला जात आहे. एमडीएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक कमोडोर (निवृत्त) राकेश आनंद व नौदलाच्या पश्चिम विभागाचे चिफ आॅफ स्टाफ आॅफिसर (टेक्नॉलॉजी) यांनी या हस्तांतरण करारावर स्वाक्षरी केली. या वेळी एमडीएल व नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पहिली पाणबुडी आयएनएस कलावरी मुंबईत नौदलाच्या सेवेत आहे तर खंदेरीदेखील मुंबईत नौदलाच्या ताफ्यात सेवा पुरवणार आहे.
पुढील शनिवारी २८ सप्टेंबरला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ही पाणबुडी सेवेत रुजू होणार आहे. भारतीय नौदलात यापूर्वीदेखील आयएनएस खंदेरी या नावाने पाणबुडी कार्यरत होती. ६ डिसेंबर १९६८ रोजी ती पाणबुडी सेवेत रुजू झाली होती व सुमारे २० वर्षांच्या देशसेवेनंतर १८ आॅक्टोबर १९८९ रोजी सेवेतून बाहेर पडली होती.
देशाच्या समुद्री सीमांचे रक्षण करण्यासाठी खंदेरीचा हा दुसरा जन्म असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. स्कॉर्पिन पाणबुडी तयार करणे हे एमडीएलसमोरील आव्हान होते, मात्र हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करण्यात आम्हाला यश आल्याची भावना एमडीएलतर्फे व्यक्त करण्यात आली. पाणबुडीची निर्मिती करताना गुणवत्तेच्या बाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. अत्याधुनिक पद्धतीची वैशिष्ट्ये यामध्ये असतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले आहेत. भारतीय नौदलाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता असलेले शिपयार्ड अशी ओळख निर्माण करण्यात एमडीएलला यश आल्याचे सांगण्यात आले.
>सहा पाणबुड्या तयार करणार
एमडीएलमध्ये तयार करण्यात येत असलेल्या करंज या तिसºया पाणबुडीचे जलावतरण ३१ जानेवारी २०१८ रोजी झाले होते, त्याच्या समुद्री चाचण्या सध्या सुरू आहेत. चौथी पाणबुडी वेलाचे मे २०१९ मध्ये जलावतरण करण्यात आले होते. त्याच्या समुद्री चाचण्यांसाठी तयारी सुरू आहे. तर उर्वरित दोन पाणबुड्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्कॉर्पिन प्रकल्पांतर्गत एकूण सहा पाणबुड्या एमडीएलमध्ये तयार करण्यात येणार आहेत. एमडीएलएमध्ये १९९२ व १९९४ मध्ये तयार करण्यात आलेल्या दोन पाणबुड्या गेल्या २५ वर्षांपासून नौदलाच्या ताफ्यात आपली सेवा देत आहेत.