Join us  

सायलेंट किलर 'वागशीर' पाणबुडी लॉन्च; १८ टोरपीडो ट्युब अन् ५० दिवस समुद्रात राहण्याची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 4:56 PM

स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुडीच्या निर्मितीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

मुंबई- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने निर्माण केलेल्या प्रोजेक्ट ७५ च्या स्कॉर्पिन वर्गाची सहावी पाणबुडी 'वागशीर'  आज लॉन्च करण्यात आली. वागशीरच्या आजच्या 'जलावतरण' कार्यक्रमात डिफेन्स सिक्रेटरी डॉ. अजय कुमार शर्मा यांच्या मुख्य उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वागशीर ही स्कॉर्पिन वर्गाची सहावी आणि शेवटची पाणबुडी आहे. वर्ष-दीड वर्ष तिच्या बंदरात, तसेच खोल समुद्रात चाचण्या होतील. त्यानंतरच तिचा समावेश नौदल ताफ्यात केला जाईल.

स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुडीच्या निर्मितीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच प्रगत ध्वनिक सायलेन्सिंग तंत्रज्ञान, कमी रेडिएशन नॉइज लेव्हल, हायड्रो-डायनॅमिकली ऑप्टिमाइझ्ड आकार आणि अचूक शस्त्रांनी शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता यासारख्या उत्तम वैशिष्ट्यांची खात्री करण्यात आली आहे. या स्कॉर्पीन-श्रेणीच्या पाणबुड्या पाण्याखाली किंवा पृष्ठभागावर दोन्ही टॉर्पेडो आणि ट्यूब-लॉँच अँटी-शिप क्षेपणास्त्रांसह शत्रूवर हल्ला करू शकतात. 

स्कॉर्पीन वागशीर सायलेंट किलर म्हणून ओळखली जाते. स्कॉर्पीन पाणबुड्या विविध मोहिमा पार पाडू शकतात, जसे की पृष्ठभागविरोधी युद्ध, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्तचर माहिती गोळा करणे, माईन्स पेरणे, क्षेत्रावर पाळत ठेवणे इत्यादी. त्यामुळे भारतीय नौदलाची ताकद अजून वाढणार आहे.

गायडेड वेपनचा उपयोग करुन दुश्मनांसाठी दोन हात करण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे. या पाणबुडीमध्ये १८ टोरपीडो ट्युब असून टोरपिडो आणि मिसाइल डागण्यासाठी याचा वापर होईल. या पाणबुडीची लांबी ६७.५ मीटर तर उंची १२.३ मीटर असून ३५० मीटरपर्यंत ही पाणबुडी समुद्रात खोलवर जाऊ शकते. शिवाय पंचेचाळीस ते पन्नास दिवस ही पाणबुडी समुद्रात प्रवास करु शकते.

टॅग्स :भारतीय नौदलमुंबई