विक्रांतसाठी गोळा केलेला पैसा गेला कुठे? सोमय्यांनी प्रश्न टाळले; कारमध्ये बसले, निघून गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 11:30 AM2022-04-07T11:30:09+5:302022-04-07T11:32:10+5:30
सोमय्यांनी ५ मिनिटांत पत्रकार परिषद आटोपली; प्रश्नांना बगल देऊन निघून गेले
मुंबई: शिवसेना संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांतवरून केलेल्या आरोपांना भाजप नेते किरीट सोमय्यांनी उत्तर दिलं आहे. अपहाराचा आरोप करणारे राऊत पुरावा म्हणून एकही कागद देऊ शकले नाहीत. या प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल केली. मात्र मला तक्रारीची प्रत दिली नाही, असं सोमय्या म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सेव्ह विक्रांत मोहिमेत एकाही रुपयाचा घोटाळा झालेला नाही. राज्य सरकारनं याची चौकशी करावी. आम्ही चौकशीला घाबरत नाही, असं सोमय्यांनी म्हटलं. विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेले पैसे कुठे वापरले, मनी लॉण्ड्रिंग कसं झालं, याची माहिती काल राऊत यांनी दिली. आता राऊत यांनी पुरावे द्यावेत. सगळं लोकांसमोर आणावं, असं सोमय्या म्हणाले.
विक्रांतसाठी गोळा केलेल्या ५८ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. मात्र प्रत्यक्षात दमडीचाही घोटाळा झालेला नाही. सरकारनं तपास करावा. राऊतांनी आतापर्यंत पुरावा म्हणून एकही कागद दिलेला नाही. त्यांनी पुरावे लोकांसमोर ठेवावेत, असं सोमय्यांनी म्हटलं.
पाच मिनिटं बोलले, प्रश्न टाळून निघून गेले
विक्रांतसाठी गोळा केलेला निधी राजभवनात जमा करणार असल्याचं सोमय्या म्हणाले होते. मात्र सोमय्यांनी कोणताही निधी राजभवनात जमा केला नसल्याची माहिती राजभवनाकडून दिली आहे. त्याबद्दल विचारलं असता सोमय्यांनी प्रश्न टाळले. अवघ्या ५ मिनिटांत त्यांनी पत्रकार परिषद आटोपली. पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देऊन ते थेट कारमध्ये जाऊन बसले आणि निघून गेले.