Join us

राऊतांच्या आरोपांमुळे सोमय्यांपाठोपाठ शिवसेनाही अडचणीत येण्याची शक्यता; कोर्टात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 3:01 PM

सोमय्यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता

मुंबई: आयएनएस विक्रांत संवर्धन निधीच्या अपहार प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमय्या पिता पुत्र अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सोमय्यांचे वकील आणि सरकारी वकिलांनी या प्रकरणी न्यायालयात युक्तिवाद केला. या प्रकरणाचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे. संध्याकाळी न्यायालयाकडून निकाल सुनावला जाईल.

विक्रांत निधी संकलन प्रकरण २०१३ मधलं आहे. त्या प्रकरणी आता एफआयआर दाखल झाला आहे. यासाठी दबाव आणण्यात आला होता, असा युक्तिवाद सोमय्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. शिवसेना आणि इतर पक्षांनीदेखील विक्रांतसाठी निधी गोळा केला होता. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जमा केलेला निधी आपल्या पक्षाकडे सुपूर्द केला, असंही सोमय्यांचे वकील पुढे म्हणाले. या युक्तिवादामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सोमय्या यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई होत असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. बाप बेटे तुरुंगात जातील, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर हे प्रकरण बाहेर काढण्यात आलं. त्यासाठी बराच राजकीय दबाव होता, असाही दावा सोमय्यांच्या वकिलांकडून करण्यात आला. 

तक्रारदारानं आयएनएस विक्रांतसाठी ११ हजार रुपये दिल्याचा दावा केला आहे. मात्र त्याच्याकडे कोणतीही पावती नाही. त्यानं ९ वर्षांनंतर तक्रार दाखल केली आहे. रस्त्यावर उभं राहून ५७ कोटी रुपये गोळा केले जाऊ शकतात, असा सवाल सोमय्यांच्या वकिलांनी उपस्थित केला. शिवसेना, भाजपचे संबंध बिघडले असल्यानंच हे प्रकरण उकरून काढण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय?रेल्वे स्थानकाबाहेर दोन्ही आरोपी (सोमय्या पितापुत्र) सेव्ह विक्रांत असा उल्लेख असलेले टी-शर्ट घालून पैसा गोळा करत असल्याचे फोटो उपलब्ध आहे. विक्रांतसाठी पैसे जमा करणाऱ्यांना त्यांच्याकडून कोणतीही पावती दिली जात नव्हती. त्यांनी साडे अकरा हजार गोळा केल्याचं सांगितलं. ही रक्कम लहान असली तरी अपहार हा अपहार असतो. ती रक्कम राजभवनात जमा झालेली नसल्याचं खुद्द राजभवनाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे ती रक्कम गेली कुठे याचं उत्तर मिळायला हवं. त्यासाठी सोमय्या पिता पुत्रांना कोठडी दिली जावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली.

टॅग्स :किरीट सोमय्यासंजय राऊत