मुंबई : नौदल आयोजित ‘वेस्टर्न फ्लीट व्हीलर पुलिंग रीगाटा’ स्पर्धेत आयएनएस विराटच्या अधिकारी खलाशी यांनी दमदार कामगिरी करत बाजी मारली. या विजयामुळे स्पर्धेतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या कोंबडा चषकावर आयएनएस विराटने नाव कोरून पुढील वर्षभरासाठी कोंबडा जहाज हे नाव धारण केले आहे. या नौका स्पर्धेत आयएनएस विक्रांतला मात्र उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.शारीरिक शक्ती, सांघिक कामगिरी, उत्कृष्ट नेतृत्वक्षमता या सर्वांची चाचणी म्हणजे ही स्पर्धा होय. या स्पर्धेतील सर्व निकषांवर आयएनएस विराट संघाने संपूर्ण ताकदीनिशी उतरून स्पर्धेतील विजयश्री खेचून आणली. स्पर्धेत बक्षीस वितरण समारंभाला व्हाइस अॅडमिरल एसपीएस चीमा, फ्लॅग अधिकारी कमांडिंग-इन-चीफ आणि वेस्टर्न नेव्हलचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत विजेत्या संघाला मानाचा कोंबडा चषक देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अधिकारी, वरिष्ठ खलाशी आणि कनिष्ठ खलाशी अशा तीन गटांत संपन्न झालेल्या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील विविध संघांचे तंत्रशुद्ध पद्धत, प्रचंड उत्साह, दमदार प्रदर्शनाचे व्हाइस अॅडमिरल यांनी कौतुक केले. भारतीय नौदलात पश्चिम विभागामध्ये मुंबईचे स्थान महत्त्वाचे आहे. तसेच देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेदेखील ते महत्त्वाचे आहे. आम्हाला अभिमान आहे की, कशीचीही पर्वा न करता नौदल आपले कर्तव्य चोख पार पाडत आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
आयएनएस विराट आता कोंबडा जहाज
By admin | Published: December 27, 2015 2:26 AM