खाकीच असुरक्षित!
By Admin | Published: February 10, 2016 04:17 AM2016-02-10T04:17:45+5:302016-02-10T04:17:45+5:30
पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रकार वाढतच चालले आहेत. गेल्या वर्षभरात पोलिसांना मारहाणीच्या २०१ घटना घडल्या. याप्रकरणी २४३ जणांना अटक करण्यात आली आहे. खाकी वर्दीवाले
- मनीषा म्हात्रे, मुंबई
पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रकार वाढतच चालले आहेत. गेल्या वर्षभरात पोलिसांना मारहाणीच्या २०१ घटना घडल्या. याप्रकरणी २४३ जणांना अटक करण्यात आली आहे. खाकी वर्दीवाले कर्तव्य बजावीत असताना त्यांना प्रतिकार करण्याचे त्यांच्या कमात हस्तक्षेप करण्याचे प्रकार वाढत असल्याने खाकीच असुरक्षित असल्याचे दिसत आहे.
पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांचा पासपोर्ट आणि वाहन परवाना रद्द करण्यात यावा, अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात यावा, अशा आरोपींना सरकारी नोकरी मिळू नये, पहिल्या हल्ल्यानंतर त्यांच्याकडून बॉण्ड लिहून घेत दुसऱ्या हल्ल्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे आदेश तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी दिले होते. ते वगळता कडक धोरण स्वीकारले गेले नाही, त्यामुळे या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गतवर्षी १८८ गुन्ह्यांची उकल झाली. २०१४ च्या तुलनेत यामध्ये ६४ गुन्ह्यांची भर पडली आहे. पूर्व उपनगरात गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक असून तेथे गतवर्षात पोलिसांवरील हल्ल्याचे ७५ प्रकार घडले.
खाकी वर्दीचा धाक आरोपींना राहिलाच नसून याला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कायद्यातील तरतुदी कारणीभूत असल्याचे अधिकारी सांगतात. पोलिसांवर हल्ला झाला आणि आरोपीला अटक झाली तरी ते जामिनावर बाहेर येतात आणि खटला वर्षानुवर्षे चालत राहतो. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना तत्काळ शिक्षा करण्याची तरतूद असणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
आणखी किती पोलीस ठरणार हल्लेखोरांचे लक्ष्य?
२० जानेवारी २०१५ - नाकाबंदीवेळी तपासणीसाठी गाडी अडविल्याने व्यावसायिक रामचंद्र चौबे आणि संजय सत्यनारायण सिंग यांनी मुलुंडचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश बागुल यांना मारहाण केली होती.
२४ मे २०१५ -
काँग्रेसच्या एनएसयूआयचा अध्यक्ष विपिन सिंग याने त्याच्या सहा साथीदारांच्या मदतीने घाटकोपर पोलीस ठाण्यातील तीन पोलीस उपनिरीक्षकांना भर रस्त्यात बेदम मारहाण केली होती.
१९ आॅक्टोबर २०१५ -
जे. जे. रुग्णालयातील तीन निवासी डॉक्टरांनी ताडदेव येथे मद्यधुंद अवस्थेत पोलिसांवरच हल्ला चढविला. त्यांना अटक झाली. जे. जे. रुग्णालयातील औषधे, अस्थिरोग आणि किरणोत्सर्ग या विभागांतील तीन डॉक्टरांनी ताडदेव विभागात थेट पोलिसांवर हल्ला चढवला. डॉ. शिव पंकज महेंद्र, डॉ. वेद आशिष रवीश आणि डॉ. राहुल जैन अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघेही प्रथम वर्षाचे निवासी डॉक्टर आहेत.
२५ सप्टेंबर २०१५ -
रात्रीचे साडेदहा वाजल्याने डीजे बंद करा व विसर्जन मिरवणूक शांततेत न्या, असे सांगायला गेलेल्या पोलिसांनाच समतानगर येथे एका गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांने मारहाण केली. बेधुंद कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात उपनिरीक्षक सतीश वायळ यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी ७ पुरुष व ९ महिलांना ताब्यात घेतले आहे.
२१ आॅगस्ट २०१४ -
चौकशीसाठी भाजपा कार्यकर्त्याला नवघर पोलीस ठाण्यात आणल्याच्या रागातून भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी पोलीस निरीक्षक संपत मुंडे यांना धक्काबुक्की केली.
२४ एप्रिल २०१४ -
लोकसभा निवडणुकीवेळी मनसे आणि सेना यांच्यातील वाद मिटवून मनसे कार्यकर्त्यांना ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात नेताना पोलीस हवालदार अशोक थोरबोले यांच्यावर खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यात थोरबोले यांचा गळा चिरला जाऊन ते गंभीर जखमी झाले. प्रकरणातील आरोपी कामिनी शेवाळे यांना न्यायालयाने
अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
१५ नोव्हेंबर २०१४ -
डोंगरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस नाईक अजय गावंड (४३) यांचा चोराने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. वाडीबंदरच्या दुमजली इमारतीच्या गच्चीवर पोहोचलेल्या संतोष साळवी या चोराला पकडण्यासाठी गावंड सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. साळवीची समजूत काढत गावंड पाइपला लटकून गच्चीवर पोचणार इतक्यात साळवीने त्यांच्या डोक्यात लाकडी बांबू घातला. बांबूच्या सततच्या प्रहारामुळे गावंड खाली पडले आणि गंभीररीत्या जखमी झाले होते. याप्रकरणी साळवीला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली होती.
७ नोव्हेंबर २०१४ - बारमध्ये राडा करणाऱ्यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण झाल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. या मारहाणीत मुलुंड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपाई जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांना गजाआड केले. यापैकी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता.
१९ मार्च २०१३ -
वरळी सी-लिंकवर भरधाव वेगाने जाणारी आमदार क्षितिज ठाकूर यांची गाडी अडविल्याच्या रागातून आमदार राम कदम आणि ठाकूर यांनी विधानभवनात साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केली होती. या प्रकरणी आरोपी कदम आणि ठाकूर
यांच्या अटकेनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती.
२०१४ च्या तुलनेत यामध्ये ६४ गुन्ह्यांची भर पडली आहे. पूर्व उपनगरात या गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक असून तेथे गतवर्षात पोलिसांवरील हल्ल्याचे ७५ प्रकार घडले.
गेल्या वर्षी मुंबईत पोलिसांवरील हल्ल्यांचे
२०१
गुन्हे दाखल झाले.
यापैकी अवघ्या १८८ गुन्ह्यांची उकल झाली.
मुंबई पोलिसांनी जाहीर केलेली आकडेवारी...
वर्षेगुन्हेउकलजखमी पोलीस आरोपी
२०१५२०११८८१९७ २४३
२०१४१३७१३२
नागरिकांची पोलिसांबद्दलची मानसिकता बदलत चालली आहे. त्यात सध्या तरी पोलिसांवर हल्ला केल्यास सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येते.
- धनंजय कुलकर्णी, पोलीस प्रवक्ते, मुंबई पोलीस