सागर नेवरेकर मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित यंदाची थीम ‘बीट एअर पोल्युशन’ अशी आहे. खेड्यापाड्यापेक्षा शहरामध्ये वायुप्रदूषण झपाट्याने वाढत आहे. शहरामध्ये विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षे तोडली जातात. परंतु झाडे तोडल्यावर त्याबदल्यात दोन झाडे लावण्याच्या नियमाचे पालन कोणीही करताना दिसून येत नाही. भविष्यात अशी एक वेळ येईल की, आपल्या हातून पर्यावरणाला वाचविण्यासाठीचा वेळ निघून गेलेला असेल. त्यामुळे मानवाने वेळीच जागे राहून पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी हातभार लावला पाहिजे. अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.
मान्सूनचे आगमन झाल्यावर शहरातील तुंबलेली गटारे, नाले यांच्यातील प्लॅस्टिक व इतर कचरा पहिल्या पावसामध्ये समुद्रात समाविष्ट होतो. जुहू व दादर समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक वैद्यकीय कचरा व रासायनिक द्रव्ये आढळून येतात़ जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात मासे बºयापैकी मिळतात. परंतु बाकीच्या महिन्यांत मासे कमी प्रमाणात मिळतात. दरवर्षी वाढणारा कचरा आणि सांडपाण्याच्या प्रमाणामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगड येथील पारंपरिक मच्छीमारांचा व्यवसाय ठप्प झाला. मच्छीमारांकडे पर्याय नसल्यामुळे खोल पाण्यात मच्छीमारी करावी लागते. सगळी बंधने मच्छीमारांवर लावली जातात. मात्र, कचरा आणि सांडपाणी सोडणाºया उद्योगधंद्यावर कोणतीही बंधने लादली जात नाहीत. शासनाने नियम लादताना मच्छीमारांप्रमाणे उद्योगधंद्यांवरही लागू केले पाहिजेत. तरच समुद्री प्रदूषणाला आळा घातला जाईल, असे मच्छीमार गणेश नाखवा यांनी सांगितले.
कासवाचे मुख्य खाद्य जेलीफिश असतात. ज्या वेळी प्लॅस्टिकच्या पिशव्या पाण्यावर तरंगत असतात त्या वेळी कासवांना असा भ्रम होतो की, जेलीफिश पाण्यावर तरंगत आहेत त्यामुळे कासव त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या खातात. छोटे मासे मायक्रो प्लॅस्टिक खातात. त्यामुळे समुद्री जीवांचे आरोग्य धोक्यात आहे. माणसाच्या शरीरातही कोणत्या ना कोणत्या प्रकारे मायक्रो प्लॅस्टिक जाते. त्यामुळे कर्करोगासारखा आजार झपाट्याने वाढू लागला आहे.
वायुप्रदूषण वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाहतूक यंत्रणा. इंधनावर चालणाºया वाहनांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे वाहतूककोंडी प्रचंड होऊ लागलेय. नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहनांचा वापर केला तर वाहतूककोंडी आणि वायुप्रदूषणाला थोडा का होईना आळा घालू शकतो. डम्पिंग ग्राउंडमध्ये कचºयाला आग लागण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आगीमधून सर्वाधिक विषारी वायू बाहेर पडतो. झाडांच्या कत्तली थांबविल्या पाहिजेत. शहरातील हिरवळ कमी होत आहे. मागील चार वर्षांमध्ये देशातील जंगल १ लाख २० हजार हेक्टरपेक्षा कमी झाले आहे. वृक्षारोपण जास्त करून कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी केले पाहिजे. - निशांत बंगेरा, पर्यावरणप्रेमी.
वायुप्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या संख्येने झाडांची लागवड करणे गरजेचे आहे. वाहनांचा वापर कमी प्रमाणात करायला हवा. जिथे मोकळी जागा मिळेल, तिथे झाडे लावायला हवीत. बाहेरगावी फिरायला जाताना अधिक वाहनांचा वापर न करता एकाच वाहनाचा वापर करावा. एकच गाडी रस्त्यावर धावली तर इंधनाची बचत आणि वायुप्रदूषण कमी होईल. प्रदूषणावर मात करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. - संतोष शेट्टी, संस्थापक, वी ऑल कनेक्ट संस्था.