इन्फ्रा कॉन्क्लेव्हमधून भविष्याचा वेध: ऋषी दर्डा; अशा उपक्रमांचा मुंबईकरांना फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 11:33 AM2024-10-11T11:33:20+5:302024-10-11T11:36:05+5:30
याचा मुंबईकरांना निश्चित फायदा हाेईल, अशी भूमिका लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भविष्यातील पायाभूत सुविधांचा वेध घेताना मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात पायाभूत सुविधांसाठी येणाऱ्या अडचणी आणि समस्यांवर कशी मात करायची यासाठी विविध शासकीय आणि खासगी प्राधिकरणे आम्ही या कॉनक्लेव्हद्वारे एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. याचा मुंबईकरांना निश्चित फायदा हाेईल, अशी भूमिका लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मांडली.
या चर्चासत्रातून लोकांना विविध शासकीय आणि खासगी प्राधिकरणे पायाभूत सुविधांची कोणती कामे करीत आहेत, याची माहिती मिळेलच; याशिवाय आपल्याला काय करता येईल याचा वेध घेता येणार असल्याची अपेक्षा दर्डा यांनी व्यक्त केली.
ठाणे, कल्याण, डाेंबिवलीहून राेज लाखाे लाेक मुंबईत येतात आणि तेवढेच लाेक परत जातात. या सगळ्यांना लागणाऱ्या सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या विविध प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे. ते यातून सकारात्मक मार्ग दाखवतील. असे सांगून ऋषी दर्डा म्हणाले, मागील काही वर्षांत इथे बसलेल्या सगळ्यांसाठी ठिकठिकाणी चालणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या बांधकामामुळे प्रवास कठीण हाेत आहे.
मात्र, येत्या काही काळात या सगळ्याची चांगली फळे आपल्याला जलद, वेगवान आणि आरामदायी प्रवासातून मिळतील, अशी अपेक्षा दर्डा यांनी व्यक्त केली. मागच्या काही महिन्यांत एमएमआरडीएच्या काही प्रकल्पांमुळे मुंबईकरांचा प्रवास वेगाचा झाला त्यासाठी त्यांनी प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांचे तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्पानेही आता वेग घेतल्याबद्दल विजय सिंघल यांचे त्यांनी विशेष कौतुकही केले.