मुंबई : लॉकडाऊन कालावधीत एसटी महामंडळात काम करत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने केली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई, पालघर, ठाणे येथून एसटीची सेवा सुरू आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता एसटीचे अधिकारी, कर्मचारी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा देत आहेत.
राज्यातील काही विभागात एसटी सेवा सुरू झाली आहे. ही सेवा देताना अनेक अडचणी येत आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. स्थानिक प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. एसटीच्या कुर्ला नेहरू आगारातील सुमारे १० ते १२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. तर, काही कर्मचाऱ्यांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी सारखा त्रास सुरू झालेला आहे. यामुळे इतर कर्मचाऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. याचा थेट परिणाम कामगिरीवर आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर ही होणार आहे. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न केल्यास कोरोणाची बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केली.