टप्पा तिसरा; ५० हून अधिक वयासह अतिजोखमीचे आजार असणाऱ्यांना देणार लस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोराेना प्रतिबंधक लसीकरण प्रक्रियेचा वेग वाढविण्यासाठी पालिका प्रशासन लवकरच खासगी रुग्णालयांना परवानगी देणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील सामान्य नागरिकांच्या लसीकरणासाठी पालिका प्रशासनाला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि सेवासुविधांची गरज भासणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत खासगी वैद्यकीय संस्थांचा समावेश करण्यात येईल. याकरिता पुढील आठवड्यात पालिका खासगी रुग्णालयांची पाहणी करणार आहे.
मागील काही दिवसांत पालिका प्रशासनाने शहर, उपनगरातील २१ खासगी रुग्णालयांची यादी तयार केली आहे. या रुग्णालयांमध्ये ते लसीकरण प्रक्रियेविषयीचे विविध निकष तपासून पाहणार आहेत. त्यानंतरच त्यांना लसीकरण्यासाठी परवानगी देण्यात येईल. शहर, उपनगरातील खासगी रुग्णालयांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण म्हणजे ५० हून अधिक वय असणाऱ्या व अतिजोखमीचे आजार असणाऱ्यांना लस देण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यात असोसिएशन ऑफ हॉस्पिटलच्या वतीने पालिकेला लेखी निवेदन देऊन लसीकरण प्रक्रियेसाठी संमती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन पालिकेने गुगल फॉर्मद्वारे खाजगी रुग्णालयांना सर्व निकष भरण्याचे आवाहन केले.
..............................
याविषयी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, लसीकरण प्रक्रियेसाठी शहर उपनगरातून शंभरहून अधिक खासगी रुग्णालयांनी तयारी दर्शविली होती. या पालिका प्रशासनाने २१ खाजगी रुग्णालयांना प्राथमिक पातळीवर नियुक्ती केली आहे. यानंतर पालिकेच्या विशेष चमूद्वारे या खाजगी रुग्णालयांची पडताळणी करण्यात येईल, त्यानंतर या विशेष समितीने परवानगी दिल्यानंतर लसीकरणाच्या प्रक्रियेत खासगी रुग्णालयांना समाविष्ट करण्यात येईल.