मुंबई - मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे माननीय सभापती विनोद घोसाळकर यांनी नुकतीच नायगाव-दादर येथील सुमारे ९५ वर्षे जुन्या अहमद सेलर या १ ते ८ क्रमांकांच्या उपकरप्राप्त इमारतींची पाहणी केली व रहिवाशांच्या अडचणी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन केले.
नायगांव -दादर येथील 'अ' वर्गात मोडणाऱ्या या उपकर प्राप्त इमारतीं अत्यंत जीर्ण अवस्थेत असून मोडकळीस आल्या आहेत . या इमारतींमध्ये ३३८ कुटुंबे राहत असून व ४२ अनिवासी गाळे आहेत. या इमारतींमधील रहिवाशांनी केलेल्या विनंतीवरून श्री. घोसाळकर यांनी अहमद सेलर या १ ते ८ क्रमांकांच्या उपकरप्राप्त इमारतींची पाहणी केली व तेथील रहिवाशांसह चर्चा केली. यावेळी श्री. घोसाळकर यांनी रहिवाशांच्या अडचणी-समस्या जाणून घेत इमारतींच्या पुनर्विकासातील अडचणींबाबत रहिवाशांना मार्गदर्शन केले. श्री. घोसाळकर म्हणाले की, तळ +२, तळ + ३ मजले असणाऱ्या या आठ इमारतींची मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत सन २०१३ पासून अद्यापपर्यंत दोन ते पाच टप्प्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. या इमारती दुरुस्ती मर्यादेच्या पलीकडे गेल्या असून त्यांची पुनर्रचना करणे गरजेचे असल्याचे मत श्री. घोसाळकर यांनी व्यक्त केले . रहिवाशांनी या बाबत एकमत केल्यास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश देखील त्यांनी या प्रसंगी दिले.
यावेळी नगरसेविका श्रीमती श्रद्धा जाधव, नगरसेविका श्रीमती उर्मिला पांचाळ, मंडळाचे उपमुख्य अभियंता महेश जेस्वानी, कार्यकारी अभियंता मीनल जगताप आदींसह रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.