घरात घुसून दाम्पत्यावर हल्ला

By admin | Published: March 29, 2017 04:05 AM2017-03-29T04:05:34+5:302017-03-29T04:16:45+5:30

नागपाडा येथील बच्चूभाई कम्पाउंडमध्ये मंगळवारी दळवी दाम्पत्यावर अज्ञात व्यक्तीने घरात घुसून धारदार शस्त्राने केलेल्या

Inspecting a couple in the house | घरात घुसून दाम्पत्यावर हल्ला

घरात घुसून दाम्पत्यावर हल्ला

Next

मुंबई : नागपाडा येथील बच्चूभाई कम्पाउंडमध्ये मंगळवारी दळवी दाम्पत्यावर अज्ञात व्यक्तीने घरात घुसून धारदार शस्त्राने केलेल्या हल्यात समीरा जुल्फी दळवी (४०) यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती जुल्फी दळवी (४९) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागचे कारण अजून समजलेले नाही.
दळवी दाम्पत्य नागपाडा येथील बच्चूभाई कम्पाउंडमध्ये भाड्याने राहतात. येथेच त्यांची एक पानटपरी आहे. तसेच जुल्फी हे कुलाबा येथील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कामालाही आहेत. हे दाम्पत्य नुकतेच येथे राहण्यास आले होते, त्यांना तीन मुले असून ते गुहागरला असतात. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांचा भाऊ गावावरून घरी आला तेव्हा अर्धवट उघड्या असलेल्या दरवाजातून त्याने आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्याने आरडाओरडा करत स्थानिकांना बोलावून घेतले. दोघांनाही जे.जे. रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच नागपाडा पोलीस  तेथे दाखल झाले. यामध्ये समीरा यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले होते, तर जुल्फी दळवी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

लुटीच्या हेतूने की पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहेत. हल्ल्यामागे ओळखीच्याच व्यक्तीचा हात असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. ‘रात्री साडेनऊच्या सुमारास आम्ही दोघेही झोपी गेलो. त्यानंतर काय झाले? कसे झाले? याबाबत काहीही आठवत नाही’ अशी माहिती जुल्फी दळवी यांनी पोलिसांना दिली आहे. 

हत्या आणि हत्येचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र त्यांच्या शेजारऱ्यांनी दिलेल्या माहितीनूसार दळवी पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. त्यामुळे या वादातूनच जुल्फी दळवी यांनी पत्नीची हत्या करुन स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी अनोळखी इसमावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचाही शोध सुरू असल्याची माहिती नागपाडा पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी) 

Web Title: Inspecting a couple in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.