Join us

विमानांच्या इमर्जन्सी दरवाजांची तपासणी पूर्ण; अलास्का विमानातील प्रकारानंतर डीजीसीएने दिले होते निर्देश

By मनोज गडनीस | Published: January 08, 2024 6:52 PM

शनिवारी अमेरिकेत प्रवास करणाऱ्या अलास्का कंपनीच्या ताफ्यातील बोईंग कंपनीच्या ७३७ मॅक्स-९ या विमानाचा दरवाजा भर हवेत अचानक उघडला.

मुंबई- अमेरिकेच्या आकाशात उडत असताना अचानक अलास्का कंपनीच्या विमानाचा इमर्जन्सी दरवाजा उघडल्यानंतर भारतीय नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) भारतीय कंपन्यांच्या त्यांच्या इमर्जन्सी दरवाजाची तपासणी करण्याचे निर्देश जारी केले होते. त्यानंतर आता अकासा एअर, स्पाईस जेट, एअर इंडिया यांनी आपल्या विमानांच्या दरवाजांची तपासणी पूर्ण करून ते सुस्थितीत असल्याचा अहवाल डीजीसीएला सादर केला आहे. 

शनिवारी अमेरिकेत प्रवास करणाऱ्या अलास्का कंपनीच्या ताफ्यातील बोईंग कंपनीच्या ७३७ मॅक्स-९ या विमानाचा दरवाजा भर हवेत अचानक उघडला. त्याचे अत्यंत भयावह व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर ज्या भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात बोईंग ७३७ - मॅक्स ९ जातीची विमाने आहेत त्यांनी तातडीने आपल्या दरवाजांची स्थिती तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश डीजीसीएने दिले होते. या कंपन्यांनी एका दिवसात तातडीने ही चाचणी पूर्ण करून दरवाजे सुस्थितीत असल्याचा अहवाल सादर केला आहे. आजच्या घडीला भारतामध्ये या जातीची एअर इंडियाच्या ताफ्यात ४, स्पाईज जेटच्या ताफ्यात ८ तर अकासाच्या ताफ्यात २० विमाने आहेत.

टॅग्स :मुंबईविमान